राज ठाकरे अंधेरीचा गेम पालटणार?; भेटीगाठींचा ‘राज’कीय अर्थ काय?

| Updated on: Oct 16, 2022 | 11:32 AM

शिंदे गट आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मनसे भाजपच्या उमेदवारापाठी असल्याचे सूचक संकेतही राज यांच्याकडून दिले जात असल्याचं सांगितलं जात आहे.

राज ठाकरे अंधेरीचा गेम पालटणार?; भेटीगाठींचा राजकीय अर्थ काय?
राज ठाकरे अंधेरीचा गेम पालटणार?; भेटीगाठींचा 'राज'कीय अर्थ काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीला कालपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (rutuja latke) आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कालपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. दोघांनीही शनिवारचा दिवस भेटीगाठींवर भर देण्याच्या कामी लावला. दोघांचेही मतदारसंघात उत्सफूर्त स्वागत करण्यात आलं. मात्र, अंधेरीत राजकारण तापलेलं असतानाच दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू झाल्या आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आज भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज यांची भेट घेतली. त्यामुळे अंधेरीचा गेम राज ठाकरे पालटणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये बंददाराआड तब्बल 20 मिनिटे चर्चा झाली. यावेळी अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीवर चर्चा करण्यात आली. तसेच राज्यातील इतर प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. मात्र, या भेटीतील चर्चेचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरे अंधेरीत प्रचाराला जाणार का? मनसे उघडपणे भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार का? आदी प्रश्न गुलदस्त्यातच राहिले आहेत.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीची चर्चा सुरू असतानाच काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचं वृत्त आहे. दोन्ही नेत्यांनी मध्यरात्री बराचवेळ चर्चा केल्याचं सांगितलं जातं. अंधेरी पोटनिवडणूक आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत या दोन्ही नेत्यांच्या भेटीत चर्चा झाल्याचं सांगितलं जातं.

मुख्यमंत्री आणि उपुमख्यमंत्र्यांमधील भेटीचं वृत्त ताजं असतानाच आज भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत अंधेरी पोटनिवडमुकीवरच चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच पक्षाचा निरोप घेऊनही आशिष शेलार राज यांच्याकडे आल्याची चर्चा आहे. मात्र, या भेटीनंतरही राज यांनी आपले पत्ते खोलले नाहीत.

मात्र, राज ठाकरे हे भाजपला आतून पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गट आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मनसे भाजपच्या उमेदवारापाठी असल्याचे सूचक संकेतही राज यांच्याकडून दिले जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज ठाकरे अंधेरीचा गेम पालटणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.