मुंबई | 9 डिसेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा सन्मान करणाऱ्या ‘आपला बोयोस्कोप 2023’ पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान टोलेबाजी केली. “खरंतर टीव्ही 9 मराठीचा आपला बायोस्कोप हा पहिला कार्यक्रम आहे. पण राजकीय लोकांनादेखील या कार्यक्रमात स्कोप ठेवा”, असं एकनाथ शिंदे मिश्लिकपणे म्हणाले. “मगाशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बातम्यांबरोबर मनोरंजनाला देखील प्राधान्य द्या. मी नेहमी सांगत असतो की, बातम्यांबरोबर मनोरंजनपण झालंच पाहिजे. पण काही लोकहिताचे निर्णय आपण घेतो ते देखील आपल्या चॅनलवर दाखवले पाहिजे”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
“आजचा हा पुरस्कार सोहळा खऱ्या अर्थाने फार महत्त्वाचा पुरस्कार सोहळा आहे. कारण टीव्ही 9 हे नेटवर्क भारतातलं मोठं नेटवर्क आहे. त्यामुळे मराठी सिनेमा, मालिकांमधील कलावंतांचं सन्मान केलेला आहे. माझ्या हस्ते अभिनेता रितेश देशमुख यांना उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार देण्यात आला. सुभेदार चित्रपटाला पुरस्कार मिळाला. त्यांचंदेखील अभिनंदन करतो. मी स्वामी समर्थांची सिरियल बघतो. अनेक सिरियल बघतो. मला वेळ मिळत नाही. पण कधीकधी पाहतो. कुणाकुणाचं नाव घेणार? सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“रितेश देशमुख यांचं कुटुंब प्रदीर्घ राजकीय पार्श्वभूमी असलेलं कुटुंब आहे. पण राजकीय क्षेत्र न निवडता त्यांनी चित्रपट क्षेत्र निवडलं. आपण यशस्वीदेखील झालात त्याबद्दलही मी अभिनंदन करतो”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
“मी टीव्ही 9 मराठीला विनंती करतो की, अशाप्रकारचे पुरस्कार तुम्हीला आम्हाला सुद्धा दिलेत तर… म्हणजे आमच्याकडेसुद्धा टॅलेंट आहे. तुम्ही आम्हाला बेस्ट अभिनयाचे पुरस्कार देऊ शकता”, असं एकनाथ शिंदे मिश्किलपणे म्हणाले. “राजकारणी लोक अनेक भूमिका वटवत असतात. त्यामुळे तुम्हाला असा जेव्हा प्रश्न पडेल की, राजकारण्यांपैकी कुणाला पुरस्कार देऊ, याला देऊ का त्याला देऊ, अशी स्पर्धा होऊ शकते”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
“महाराष्ट्र सरकार म्हणून देखील हवेतील प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण राजकारणातही प्रदूषण वाढलं आहे. ते आपण माध्यमांनी कमी करण्याचा प्रयत्न करावा, गंमतीचा भाग आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या मागे शासन खंबीरपणे नक्कीच उभं राहील. आपल्या ज्या काही सूचना असतील त्या आम्ही सरकार म्हणून जबाबदारी म्हणून नक्कीच पार पाडू. मगाशी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही परत येऊच. महाराष्ट्र देशात नंबर एक कसा होईल, हा प्रयत्न आपल्या सगळ्यांचा असणार आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.