मुंबईः राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होतोय पण मराठवाड्यासाठी विशेषतः औरंगाबादकरांना आश्चर्य वाटेल, अशा दोन बातम्या आहेत. औरंगाबादचे संदिपान भूमरे (Sandipan Bhumre), संजय शिरसाट (Sanjay Shirsat), अतुल सावे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तर मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच टीईटी घोटाळ्यात नाव आल्याप्रकरणी अब्दुल सत्तारांचा (Abul Sattar) पत्ता कट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आज मंगळवारी शिंदे सरकारकडील मंत्रिपदी वर्णी लागलेल्या मंत्र्यांमध्ये अब्दुल सत्तारांचा समावेश झाला आणि संजय शिरसाट यांचं नाव माघारी घेण्यात आलं. औरंगाबादमधून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी आमदारांचं मन वळवण्यात मोठी जबाबदारी पार पाडणाऱ्या संजय शिरसाट यांचं नाम मंत्रिपदी फिक्स धरण्यात आलं होतं. मात्र आज शिरसाट यांचं नाव यादीत न आल्याने मोठं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. काल मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरच संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल नांदेड आणि हिंगोली दौरा होता. मात्र आज मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्यानंतर शिंदे गटातील आमदारांची महत्त्वाची बैठक काल घेण्यात आली. या बैठकीतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांच्यात बोलणी झाली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात संजय शिरसाट यांचं नाव वगळण्यात आल्याचा निर्णय झाला. मात्र बैठकीत शिरसाट यांनी मोठी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्यांदाच मंत्रिपद मिळण्याच्या अपेक्षेत असलेल्या शिरसाट प्रत्यक्ष काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी दोन दिवसांपूर्वीच टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचं नाव आल्याने मोठी राजकीय खळबळ माजली आहे. शिक्षक पात्रता परिक्षेत बोगस प्रमाणपत्र मिळवून नोकरी लागल्याप्रकरणी सत्तार यांच्या दोन मुलींची नावं उघड झाली आहेत. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जातेय. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार यांचं नाव येणार आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
औरंगाबाद मूळ शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारवर टीका केलीय. अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने हे सरकार भ्रष्टाचाराला पाठिशी घालणारे आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. 39 दिवसानंतर मंत्रिमंडळ स्थापन करणाऱ्या या सरकारचा इतिहासात उल्लेख होईल, अशी कठोर टीकाही दानवे यांनी केली आहे.