मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा थोड्याच वेळात विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion) अपक्षांना स्थान देण्यात येणार नाही. तसेच ज्या 16 आमदारांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे त्यांना या विस्तारात स्थान देण्यात येणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. ठाकरे सरकारमध्ये जे मंत्री होते त्यांनाच संधी दिली जाणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या सोबत बंड करून आलेल्या आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे शिंदे यांनी मंत्रिपद न मिळणाऱ्या आमदारांची (mla) नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे गटाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत शिंदे हे नाराजांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा तुम्हाला शब्द आहे. पुढच्या विस्तारात तुम्हाला संधी दिली जाईल. यावेळी प्रत्येकाला मंत्रीपद देणं शक्य नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगितलं जात आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे गटाच्या आमदारांची बैठक सुरू झाली आहे. स्वत: एकनाथ शिंदे हे या आमदारांची नाराजी दूर करत आहेत. कोर्टात केसेस सुरू आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार करणं शक्य नाही. कोर्टाच्या निर्णयानंतरच पूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. राज्यात दोनच मंत्र्यांचं सरकार आहे. विरोधक टीका करत आहेत. राज्यात पूरपरिस्थिती आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्यामुळे लोकांमध्येही नाराजी पसरत चालली आहे. म्हणून मंत्रिमंडळाचा काही अंशी विस्तार करणं आवश्यक असल्याने तूर्तास काही आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. ज्यांचे नाव या विस्तारात येणार नाही. त्यांना पुढील काळात मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाईल, असं शिंदे यांच्याकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे आता शिंदे यांना आमदार कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अपक्ष आमदार बच्चू कडू आणि शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. पण या दोन्ही नेत्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार नाही. मंत्रिपद मिळणार नसल्याने बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली जाणार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.
दीपक केसरकर
तानाजी सावंत
दादा भूसे
संदीपान भूमरे
गुलाबराव पाटील
शंभूराज देसाई