मुंबई : एकनाथ शिंदे यांची बंडखोरी मोडित काढण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अपयश आलं. सर्वोच्च न्यायालयातही शिवसेनेची बाजू कमकुवत ठरली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाचं सरकार येणार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री होणार असं स्पष्ट दिसत होतं. मात्र, भाजपने इथेही धक्कातंत्राचा वापर केला आणि अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली. खुद्द फडणवीसांनीच मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. राजभवनात शिंदे आणि फडणवीस यांचा शपथविधी सोहळाही पार पडला. शिंदे आणि फडणवीस यांनी लगेच कामकाजाला सुरुवातही केली. मात्र, या सगळ्यात अनेक प्रश्न निरुत्तरच राहिली. या प्रश्नांची उकल होणं खूप गरजेचं आहे. तेच प्रश्न घेऊन टीव्ही 9 मराठीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर मुलाखत घेतली. तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. पाहूया…
प्रश्न – सामान्य शिवसैनिकापासूनचा प्रवास पाहता तुम्हाला वाटलं होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ?
उत्तर – मी आतापर्यंत अपेक्षा ठेवून काम केलं नाही. जी जी संधी मिळाली ती माझ्या केलेल्या कामांमुळे, मिळालेल्या संधीचं मी नक्कीच सोनं केलं, पक्षासाठी, शिवसेनेसाठी. आज सर्वोच्च पद जे मिळालं आहे त्याबाबत मी आनंद व्यक्त करतो, समाधानही व्यक्त करतो.
प्रश्न – सरकारमध्ये होता, मंत्री होता, मग तुम्हाला बंड का करावं लागलं?
उत्तर – मी आपल्याला इतकंच सांगेन गेली तीस, चाळीस वर्षे पक्षात काम केलं. शिवसेनेचे 40 आमदार बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे जातात. विकासाचा अजेंडा, मतदारसंघाचे प्रश्न घेऊन पुढे जातात आणि हा निर्णय का घेतात, याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. आम्ही इतकी वर्षे पक्षाची सेवा करतो आणि आज हा निर्णय घेतो. काही लोक विरोधातून सत्तेत जातात. पण जिथे अन्याय होतो, तिथे अन्यायाला वाचा फोडण्याची शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिलीय. वैयक्तिक कुणाचा स्वार्थ नाही, आज आम्ही चाळीस, पन्नास लोक बाळासाहेबांचं हिंदुत्व म्हणून एकजूट दाखवली आहे.
आम्ही केवळ 50 होतो, भाजपचे 120 आहेत. पण बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून त्यांनी जे समर्थन दिलं हे उदाहरण राज्यात नाही तर देशाला डोळ्यात अंजन घालायला लावणारं आहे. त्यासाठी मी पंतप्रधान मोदी, अमित शाह, जे. पी. नड्डा यांना धन्यवाद दिलेले आहेत. खास करुन मी देवेंद्र फडणवीस यांनाही धन्यवाद देतो. कारण यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज ही परिस्थिती का निर्माण झाली, याच्या मुळाशी जाण्याची, याचा अभ्यास करण्याची गरज आहे.
प्रश्न – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे यांची घुसमट होत होती?
उत्तर – मी असं म्हणालो नाही. आज सगळ्याच गोष्टी मी स्पष्ट करु इच्छित नाही. पण आवश्यकता भासल्यास मी योग्यवेळी स्पष्टपणे बोलू शकतो.
प्रश्न – नेमकी शिवसेना कुठे आहे ? शिंदे की ठाकरेंकडे?
उत्तर – मी सांगितलं आहे की आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत. बाळासाहेब, दिघे साहेबांचे शिवसैनिक आहोत. कायद्यात, घटनेमध्ये आकडे, बहुमताला महत्व आहे आणि आमच्याकडे बहुमत आहे. कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे जेवढी हवी त्यापेक्षा जास्त आहे.
प्रश्न – बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचण्यात आलं, अशी खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली आहे.
उत्तर – आम्हालाही याची खंत आहे, आम्हाला कुठे आनंद आहे. पण यात आमची जी भूमिका होती, आपला जो मित्रपक्ष होता, ज्यांच्यासोबत आपण निवडणूक लढवली, आपण त्यांच्यासोबत कामकाज केलं पाहिजे, अशी आमची 40 – 50 आमदारांची भूमिका होती. आम्ही प्रयत्न खूप केले, पण दुर्दैवानं आम्हाला त्यात यश मिळालं नाही. म्हणूनच आजची ही वेळ आली.
प्रश्न – वेळोवेळी उद्धव ठाकरे आवाहन करत होते की, मुंबईला या समोरासमोर बसून बोला.
उत्तर – यापूर्वी चर्चा अनेकवेळा झाल्या होत्या. आमची भूमिका मला काही हवं किंवा अन्य कुणाला काही हवं अशी कधीच नव्हती. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की मला कुठलाही मोह नाही, मंत्रिपदाचा मोह नाही. जेव्हा 20 -25 आमदार आपल्या मतदारसंघासाठी, आपल्या अस्तित्वासाठी लढा देतात. तेव्हा त्यांच्या भावनेचा विचार करणं गरजेचं आहे. मी खूप प्रयत्न केले, त्यांनीही खूप प्रयत्न केले. पण मला किंवा त्यांना त्यात यश आलं नाही.
प्रश्न – उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. आदित्य ठाकरे यांनीही सांगितलं की 20 मे रोजी तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती.
उत्तर – याबाबत मला काही माहिती नाही आणि मी त्याबाबत काही बोलू इच्छित नाही.
प्रश्न – उद्धव ठाकरे म्हणाले की तुम्ही शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत
उत्तर – हा त्यांचा विषय आहे. यावर मी योग्यवेळी बोलेन.
प्रश्न – हिंदूत्व हा केवळ बहाणा आहे, ईडी आणि पैसा खरं कारण आहे आमदार फोडण्यामागे, असाही एक आरोप केला जातोय.
उत्तर – यात काहीही सत्य नाही, वस्तुस्थिती नाही, तथ्य नाही. कारण जे 50 आमदार एका वेगळ्या वैचारिक भूमिकेतून एकत्र आलेत. आपण पाहतो की एक साधा ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकही इकडे तिकडे जाताना विचार करतो. इकडे 50 आमदार एका वेगळ्या भूमिकेतून पुढे जातात. तुम्हाला मी सांगतो आमच्या 50 पैकी एकाही आमदाराला सध्यस्थितीत कुणालाही केंद्रीय तपास यंत्रणेची नोटीस नव्हती.
प्रश्न – प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, यशवंत जाधव असेही लोक तुमच्यासोबत आहे.
उत्तर – ते स्वेच्छेने माझ्यासोबत आले. त्यांना इतर आमदारांची भूमिका पटली. त्यामुळे ते सहभागी झाले आहेत. जोरजबरदस्तीनं चार लोक येऊ शकतात, 50 लोक कसे येतील. या 50 मधूल काही लोक परत यावे म्हणून खूप प्रयत्न झाले. कोर्टाचा बडगा दाखवला, निलंबनाची भीती दाखवली, आमदारकी जाईल असं सांगितलं गेलं. पण कुणीही गेलं नाही. त्यांनी एकजूट कायम ठेवली. कारण, त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. त्यांच्या अस्तित्वाची लढाई ते लढत होते. त्यामुळे त्यांच्या पाठीशी मी खंबिरपणे उभा होतो. आज जो काही निर्णय झालाय. मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात या 50 लोकांचा सिंहाचा वाटा आहे. मी सांगू इच्छितो, या 50 आमदारांना मागील अडीच वर्षात आलेला अनुभव आता येणार नाही. त्यांना त्यांच्या मतदारसंघात लोकांना अपेक्षित असलेलं काम, त्यांना हवं असलेलं काम, विकासप्रकल्प यात निधी कमी पडणार नाही, याची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून मी घेतलीय.
प्रश्न – महाराष्ट्र ते सूरत, सूरत दे गुवाहाटी, गुवाहाटी ते गोवा आणि गोवा ते महाराष्ट्र, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनण्यासाठी इतका मोठा प्रवास करावा लागला?
उत्तर – मी पुन्हा सांगतो, मुख्यमंत्रीपदासाठी हे सर्व आम्ही केलं नाही. त्यांची अस्तित्वाची लढाई होती. मतदारसंघातील लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. त्या विश्वासाला पात्र ठरण्यात काही अडचणी असतील आणि ते आमदार असमर्थ ठरत असतील तर त्याचा विचार त्यांनी केलाय. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी आम्ही भूमिका घेतली नाही. एक साफ, बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका आम्ही घेतलीय. महाविकास आघाडी सरकारमध्ये काही भूमिका शिवसेनेला घेता आली नव्हती. जी काही परिस्थिती निर्माण झाली होती, त्यातून हे सगळं घडलं आहे.
प्रश्न – भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मास्टरस्ट्रोक खेळला, तुमच्या नावाची घोषणा झाली. तुम्हाला कधी कळलं की तुम्ही मुख्यमंत्री होत आहात?
उत्तर – मलाही हे अनपेक्षित होतं. परंतु लोकांमध्ये भाजपबाबत एक विचार होता की भाजप तोडफोड करतेय, स्वत:ला मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून. पण सगळ्यांचा दावा त्यांनी खोटा ठरवला. त्यांच्याकडे संख्याबळ असूनही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर त्यांनी विश्वास दाखवला. यातून एक उदाहरण, एक मिसाल देशाला मिळेल.
प्रश्न – देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम केलं. आता तुम्ही एकत्र आहात, पण ते उपमुख्यमंत्री आहेत. थोडे नाराज आहेत असंही दिसून आलं.
उत्तर – मी पाहिलं, भाजपमध्ये शिस्तिला महत्व आहे. ते मला म्हणाले ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिलं. आज पक्षाचा आदेश आहे, की तुम्हाला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळायची आहे. पक्षाचा आदेश हा अंतिम असतो हे त्यांनी काल दाखवून दिलं.
प्रश्न – हे शिंदे सरकार फार काळ टिकणार नाही, अशीही शक्यता व्यक्त होतेय.
उत्तर – आता 170 आमदारांचं सरकार टिकणार नाही मग कुणाचं सरकार टिकणार? हे सरकार शिंदे सरकार नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे.
प्रश्न – उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय रद्द केले जात असल्याचं दिसंतय, उदाहरण द्यायचं झालं तर आरेतील मेट्रो कारशेड. ते म्हणत आहेत की राग काढायचा असेल तर माझ्यावर काढा, मुंबईकरांवर काढू नका.
उत्तर – यात राग-लोभ काढण्याचा विषय नाही. कुठलेही घेतलेले निर्णय सूडबुद्धीने रद्द करण्याचीही भूमिका नाही. पर्यावरणाचा समतोल तर राखलाच जाईल. पण जनतेच्या हिताचे निर्णय, राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जातील.
प्रश्न – शरद पवारांनी तुमचं कौतुक केलंय
उत्तर – पवारसाहेब हे मोठे नेते आहेत. त्यांनी माझ्याबाबत केलेलं भाष्य हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.
प्रश्न – 2014 ते 19 जेव्हा युती सरकार होतं. तुमच्या नेतृत्वाखाली जे सेनेचे नेते, मंत्री होते, ते म्हणत होते की आम्हाला काम करु दिलं जात नाही. अशी खंत तुम्ही अनेकदा उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली होती. त्या मंत्रिमंडळात मंत्र्यांचे राजीनामेही तयार होते. आज त्याच नेत्यांना तुमच्या नेतृत्वात भाजपसोबत काम करायचं आहे.
उत्तर – आजही तिच स्थिती होती. मंत्रिपद, आमदारकी असूनही कुचंबणा होती, काम करण्याची संधी मिळत नव्हती, वाव नव्हता. म्हणून हा निर्णय घेतलाय. 50 आमदार एवढा मोठा निर्णय घेतात याचं कारण शोधलं पाहिजे.
प्रश्न – उद्धव ठाकरे म्हणत आहेत की 2019 ला दिलेला शब्द अमित शाहांनी पाळला असता, तर महाविकास आघाडी स्थापनच झाली नसती.
उत्तर – आम्ही आज कुठलंही बेकायदेशीर काम केललं नाही. ज्या लोकांबरोबर आम्ही सार्वत्रिक निवडणूक लढवली. आज त्यांच्यासोबतच आम्ही राज्याचा गाडा हाकण्याचा निर्णय घेतलाय. हा जनतेच्या मनातील निर्णय आहे.
प्रश्न – कायदेशीर लढाई सुरु आहे, व्हिप कुणाला लागू होईल?
उत्तर – व्हिप त्यांनी लागू केला, निलंबनाची नोटीस दिली. सुप्रीम कोर्टानं त्याला स्थगिती दिली, कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. लोकशाहीत घटनेला, कायद्याला, नियमाला महत्व आहे. बहुमताला, नंबरला महत्व आहे आणि ते आमच्यासोबत आहे. आजही त्यांनी प्रयत्न केला पण उच्च न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे विजय पक्का आहे. बहुमत आमच्याकडे आहे. त्यात ज्या ज्या प्रक्रियेला सामोरं जायचं आहे त्यात यश आमचं आहे.
प्रश्न – मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंशी काही संवाद झाला आहे का?
उत्तर – ट्विटरवरुन त्यांनी अभिनंदन केलं. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आजही उद्धव ठाकरेसाहेबांबद्दल मला आदर आहे. त्यांनी जो राजीनामा दिला त्यामुळे आम्हाला आनंद झाला असं कुणीही मानण्याचं कारण नाही.
प्रश्न – आजही ते तुमचे नेते आहेत?
उत्तर – आदर आहे, राजकारणात पातळी सोडून काम करणारा मी नाही. विरोधी पक्षातील जे कुणी नेते असतील त्यांचाही मी आदर करत आलोय. त्यामुळे आता यावर मी अधिक काही बोलणं उचित होणार नाही, योग्यवेळी काही गोष्टी आवश्यकता भासल्यास स्पष्ट करण्यात येतील.
प्रश्न – भविष्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तुमच्यासोबत येऊ शकतात? हिंदूत्व हा मुद्दा आहे.
उत्तर – यावर मी आज बोलू इच्छित नाही.
प्रश्न – शिवसेनेत तुम्हाला, तुमच्यासोबतच्या आमदारांना बंडखोर म्हणतात, तुम्हाला काय वाटतं आज एकनाथ शिंदे कोण आहेत?
उत्तर – शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि शिवसेनेचा आमदार.