पुणे: आमदार उदय सामंत (uday samant) यांच्यावर काल रात्री झालेल्या हल्ल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध नोंदवला आहे. तसेच या हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी दिला आहे. गाडीवर दगड मारून पळून जाणं ही मर्दुमकी नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे काम पोलिसांचं आहे. पोलीस हल्लेखोरांवर कारवाई करतील. ज्यांनी भ्याड हल्ला करणं आणि दगड मारून पळून जाणं ही मर्दुमकी नाही. मी पोलिसांशी (police) बोलणार आहे. सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे. कोणी भडकावू भाषण करून चिथावणी देण्याचं काम करत असेल तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. उदय सामंत यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिंदे यांनी मीडियाला प्रतिक्रिया देताना हा इशारा दिला.
शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत काल पुण्यात होते. तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज येथे सामंत यांची गाडी थांबली. त्यावेळी काही हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांची गाडी फोडली. पण सुदैवाने या हल्ल्यातून सावंत थोडक्यात बचावले. आम्हाला तानाजी सावंतांवर हल्ला करायचा होता. पण सामंतांवर हल्ला झाला. म आणि व मुळे घोळ झाल्याचा दावा या हल्लेखोरांनी केला. या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हल्ल्यामुळे सावंत आणि सामंत दोघेही संतापले आहेत. तानाजी सावंत यांनी तर या हल्ल्याची आठ दिवसात रिअॅक्शन मिळेल, असा इशाराच दिला आहे. तर सामंत यांच्यावरील हल्ल्याची सरकारने गंभीर दखल घेतली असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, तानाजी सावंत यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. आम्ही शांत आहोत. याचा अर्थ असहाय्य नाही. आम्हीही दोन हात करू शकतो, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला आहे. तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आम्ही विचार बदलला म्हणून तुम्ही आमचा खून करणार आहात का?, असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.
पुण्यात काल शिवसेनेची कात्रज याठिकाणी सभा झाली. त्या सभेच्या नंतर परतत असताना काही व्यक्तींनी माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीचा काच फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा दिसून येत आहे. बऱ्याच वाहिन्यावर चित्रीकरण करण्यात आलं आहे. या सगळ्या घटनेच्या मध्ये पूर्णपणे मी स्पष्ट करू इच्छिते की, हे जे लोक आहेत ते कोण आहेत. नक्की ते जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ते गृहीत धरणे की हे शिवसैनिकच आहेत किंवा कसं आणि तो हल्ला काही पूर्वनियोजित आहे की काय वगैरे अशा पद्धतीचे आरोप केले जातात ते योग्य नाही, असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
आमच्या सभेत आदित्य ठाकरे यांनी जे भाषण केलं, आमची जी भाषणे झाली ते संपूर्णपणे लोकशाही चौकटीतलीच होती. उलट ज्यांना शिवसेनाची भूमिका पटत नाही त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं असं म्हटलं होते. त्याचा कुठल्याही प्रकारच्या गाडी फोडण्याच्या घटनेचा आणि या भाषणांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांच्या तपासात जे काही समोरी येईल. त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.