Eknath Shinde on cabinet expansion : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरुन सध्या राजकारण सुरु आहे. महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार नाही. महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमी आहे, अशा निर्णय थेट दिल्लीतून घेण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली होती. आता याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या पंढरपुरात आहे. पंढरपुरात आज अनेक लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यांचे आयोजन करण्यता आले आहे. यावेळी एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी जास्त लोक वारीत सहभागी झाले आहेत. चांगला पाऊस पडलाय, पेरण्या झाल्यात. आणखी पांडुरंगाला सांगितलंय, बळीराजाला चांगले दिवस आणं. त्याच्यावरील संकट दूर कर. शेतकरी, वारकरी, कष्टकरी, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि ज्येष्ठांना आशीर्वाद दे. त्यांच्या जीवनात सुख समृद्धी दे, असे साकडं पांडुरंगाला घातलं”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फारच स्पष्टपणे उत्तर दिले. “मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असं काहीच नाही, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल निर्णय होईल, तुम्हाला लवकरच याबद्दलची बातमी देईन”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनीही भाष्य केले. “संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, अन्यथा अनेक आमदार नाराज होतील. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी काय हरकत नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल”, असे संजय शिरसाठ यांनी म्हटले.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी चर्चा रंगली होती. पण महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार नाही, अशा निर्णय थेट दिल्लीतून घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे स्वप्न भंगल्याचे बोललं जात होतं. मंत्रिमंडळ विस्तारासाठी अनेक नेते इच्छुक असल्याची माहितीही समोर आली होती. परंतु दिल्ली भाजपातील वरिष्ठ नेत्यांकडून याबद्दल एक मोठा निर्णय जाहीर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.