मुंबई : ‘महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा केला आहे. या गटानं फुटून महाराष्ट्राला काय दिलं. त्यांना दुसऱ्या पक्षाचा आसरा घ्यावा लागेल. आमदार आमच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा सत्तांतर झालं तर वावगं वाटण्याचं कारण नाही, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. राऊतांच्या या दाव्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार पलटवार केलाय. ‘त्यांना स्वप्नात राहू द्या, ते स्वप्न पाहत असतात. त्यांना स्वप्न पाहू द्या. राज्यात 166 आमदारांचं सरकार आहे. लोकसभेतही 12 आमदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. राज्यात आणि केंद्रातही पक्षाकडे बहुमत आहे. सरकार पूर्णपणे मजबूत आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या, असा जोरदार टोला शिंदेंनी राऊतांना लगावलाय. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके (Liladhar Dake) यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
डाके यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, लिलाधर डाकेसाहेब यांच्या तब्येतेची विचारपूस करायला, मी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. लिलाधर डाकेसाहेबांचं शिवसेना वाढीसाठीचं योगदान मी खूप जवळून पाहिलं आहे. आदरणीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अगदी सुरुवातीचे जे नेते होते त्यात डाकेसाहेबांनी काम केलं आहे. आनंद दिघे साहेब आणि डाके साहेबांचे निकटचे संबंध होते. बाळासाहेबांसोबत शिवसेना वाढवण्याचं काम किंबहुना आता तर सगळ्या सोयी आहे. त्यावेळी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत डाके साहेबांनी शिवसेना वाढवण्याचं काम केलं. आज आपण जी वाढलेली शिवसेना पाहतोय त्यात डाकेसाहेबांसारख्या अनेकांचं मोठं योगदान आहे.
‘मंत्रीपद मिळूनही अगदी साधी राहणी. त्यांचं घर जर आपण पाहिलं तर यावरुन तुम्हाला अंदाज येईल की स्वत:चं काही त्यांनी तयार केलं नाही. जे केलं ते शिवसेना या चार अक्षरांसाठी, बाळासाहेबांच्या विचारांसाठी, बाळासाहेबांच्या आदेशाने त्यांनी काम केलं. अशा लोकांमुळेच बाळासाहेबांची शिवसेना पुढे गेलीय. म्हणून मी डाकेसाहेबांना भेटायला आलो. ही सदिच्छा भेट होती’, असं शिंदे यांनी स्पष्ट केलंय.
शिंदे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. त्याबाबत विचारलं असता, मी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जे ज्येष्ठ नेते आहेत, ज्यांनी शिवसेना उभी केली, त्या सर्वांचेच मी आशीर्वाद घेणार आहे. कारण यांचा जो काही गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. तो मला नक्की या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, जनतेच्या भल्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग मी नक्कीच करुन घेणार आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.
मंत्रिमंडळ विस्तार तर होईलच. पण मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर आपण पाहताय की शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठे निर्णय घेतली. पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला, दुष्काळग्रस्त भागात पाणी वळवण्याचा निर्णय घेतला. कालच्या कॅबिनेटमध्ये आम्ही अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. अनेक प्रकल्प जे राज्याच्या हिताचे आहेत ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्याचे युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार आहे. सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. राज्याचं काम आम्ही थांबू दिलं नाही, असा दावा करत शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलंय.