औरंगाबाद : संजय राऊत (sanjay raut) यांची चौकशी चालू आहे ना. चालू द्या. त्यांना अटक होणार की नाही मला माहीत नाही. मी काही अधिकारी नाही. ईडीची (ED) चौकशी सुरू आहे. चौकशी होऊ द्या. राऊतांनीच सांगितलंय, मी काही केलं नाही. मग कर नाही त्याला डर कशाला? चौकशी होऊ द्या. त्यातून सत्य पुढे येईलच, असं सांगतानाच ते महाविकास आघाडीचे मोठे नेते होते. रोज सकाळी 9 वाजता ते बोलत होते, असा चिमटाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी लगावला. तसेच ईडीच्या भीतीने, दबावाने कुणीही आमच्याकडे येऊ नये. आमच्या शिवसेनेत येऊ नये आणि भाजपमध्येही कुणी जाऊ नये, असं मी जाहीरपणे आवाहन करत आहोत, असं सांगतानाच आम्ही कधीच कुणाला दबाव किंवा दहशतीने आमच्याकडे आणलं नाही, असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मराठवाड्यातील पूरपरिस्थिती, शेतीचं नुकसान, नागरिकांच्या गुरं ढोरं आणि घरांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना विविध योजनांची माहिती दिली. तसेच काही महत्त्वाच्या घोषणाही केल्या. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना टोलेही लगावले. मी जाहीरपणे सांगतो. ईडीच्या भीतीने कोणी आमच्याकडे येत असेल तर कृपया येऊ नका. शिवसेनेकडेपण येऊ नका आणि भाजपकडेही येऊ नका. आम्हाला दबाव टाकून कुणाला घ्यायचं नाही. हे मी जाहीरपणे या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. खोतकर असो की कोणीही असो. ईडीच्या कारवाईला घाबरून, भिऊन, दडपणाखाली कुणीही असं पुण्याचं काम करू नका, असं शिंदे म्हणाले.
मरेन पण शिवसेना सोडणार नाही, असं ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडी कारवाईनंतर केलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना कोणी भाजपमध्ये बोलावलं का? असं कोणी निमंत्रण दिलं का? असा उरफाटा सवाल करत मुख्यमंत्री शिंदे यांनी राऊत यांच्या ट्विटची खिल्ली उडवली.
केंद्रीय तपास यंत्रणांनी काही कारवाई केली आहे. यापूर्वीही केली आहे. जर सुडाने आणि चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असती तर न्यायालयाने लगेच त्यांना दिलासा दिला असता. यापूर्वी ज्या कारवाया झाल्या त्या तपासून घ्या. सुडाच्या कारवाईची गरज काय? आम्ही एवढं मोठं सरकार बनवलं. सगळं झालं. ज्या घडामोडी पाहिल्या त्यात एक तरी सुडाची कारवाई पाहिली का? कुणाच्या दबावाखाली आमदार आणि खासदार आमच्याकडे आले का? ईडीची नोटिस पाठवली म्हणून इकडे आलो असं कोणी म्हणालं का? असा सवालही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर करणार असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं. दोघांचं सरकार असलं तरी निर्णय घेण्यात आम्ही कमी पडलो नाही, असंही त्यांनी सांगितलं. तसेच सरकार पूर्ण कालावधी करून पुढील निवडणुकाही जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.