मोजक्याच बहिणींच्या खात्यात पैसे का गेले?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान काय?

| Updated on: Aug 14, 2024 | 8:16 PM

राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचे हप्ते येण्यास अखेर सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात अर्ज भरलेल्या महिलांना सरकारने पैसे देण्यास सुरुवात केली आहे. आज वरळी आणि कणकवलीतील महिलेच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला आहे.

मोजक्याच बहिणींच्या खात्यात पैसे का गेले?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान काय?
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी 1500 रुपये देण्यात येणार आहे. येत्या 17 तारखेला महिलांना दोन महिन्यांचे हप्ते दिले जाणार आहेत. रक्षाबंधनाची भेट म्हणून दोन हप्ते एकदम दिले जाणार आहेत. मात्र, या योजनेचे आजच पैसे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. काही महिलांच्या खात्यात हे पैसे जमाही झाले आहेत. पण मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यावरून चर्चाही सुरू झाली आहे. मात्र, मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे का दिले जात आहेत, याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. सध्या चेकींग सुरू आहे. त्यामुळे मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले आहेत. 17 तारखेला पैसे ट्रान्स्फर करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून आम्ही खबरदारी घेत आहोत. उद्या 17 तारखेला तांत्रिक अडचणीमुळे खात्यात पैसे गेले नाही तर तुम्हीच बोंब माराल. त्यामुळे आम्ही आजच हे पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. ही ट्रायल रन सुरू असल्याने मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

जे बोलतो ते करून दाखवतो

आम्ही म्हणत होतो पैसे खात्यात येणार. त्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सावत्र भावांपासून सावध राहा. त्यांना ही योजना बंद करायची आहे. त्यासाठी ते कोर्टात गेले होते. कोर्टाने त्यांना फटकारलं. त्यांचा अर्ज फेटाळून लावला. आमचं सरकार देणारं आहे. करणारं आहे. आम्ही जे बोलतो तेच करतो. आम्ही पैसे परत घेणारे नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

अन् फटाके फुटले…

लाडकी बहीण योजने अंतर्गत आजपासून पैसे देण्यास सुरुवात झाली आहे. वरळी येथील एका महिलेच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथेही एका महिलेच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येलाच ही भेट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेचे पैसे खात्यात जमा होताच कणकवलीत फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला आहे.

ठाकरेंच्या मतदारसंघातूनच सुरुवात

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याची सुरुवात आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातूनच करण्यात आली आहे. वरळी मतदारसंघावर महायुतीचं प्रचंड लक्ष आहे. या विधनासभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी महायुतीने चांगलीच फिल्डिंग लावली आहे. त्यातच आता लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वरळीत दिला गेल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे.