संदेश शिर्के, ठाणे: भाजप नेते अमित शहा (amit shah) यांच्यासोबत बंद दरवाज्या आड झालेल्या चर्चेत त्यांनी शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद देण्याचं मान्य केलं होतं. पण निवडणुकीनंतर शहा यांनी शब्द फिरवला, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) वारंवार करत आहेत. या कारणामुळेच उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी उद्धव ठाकरे यांचा हा आरोप फेटाळून लावला आहे. मुख्यमंत्री झाल्यावर मी दिल्लीत गेलो होतो. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भेटलो होतो. त्यावेळी बंददाराआड काय झालं होतं? असा प्रश्न मी त्यांना केला. त्यावर आम्ही उद्धव ठाकरे यांना कोणताही शब्द दिला नव्हता. त्यांना मुख्यमंत्रीपदाचं कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं. उलट जुनाच फॉर्म्युला अवलंबण्याचं ठरलं होतं, असं या दोन्ही नेत्यांनी सांगितल्याचं मोदी आणि शहा यांनी सांगितल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पुन्हा एकदा या मुद्द्याला हवा मिळाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. तेव्हा त्यांनी हा खुलासा केला. मी मोदी आणि शहा यांना भेटलो आणि त्यांना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याच्या फॉर्म्युल्यावर विचारलं. त्यावेळी त्यांनी असा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता, असं स्पष्ट केलं. बिहारमध्ये नितीश कुमार यांचे आमदार कमी असताना आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं. तुमचे आमदार कमी असताना तुम्हाला मुख्यमंत्री केलं. आमदार कमी असलेल्या मित्र पक्षांना आम्ही मुख्यमंत्रीपद देऊ शकतो, तर आम्ही उद्धव ठाकरेंना शब्द देऊन कसा फिरवला असता?, असा सवालच मोदी आणि शहांनी मला केल्याचं शिंदे म्हणाले. तसेच राज्यातील जनतेने शिवसेना-भाजपच्या युतीला 100 टक्के कौल दिला होता. परंतु, तसे झाले नाही, असंही शहा म्हणाल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केलं.
राज्यातील आमचं सरकार खूप कठिण परिस्थितीत आलं. नवं सरकार आलं म्हणून आतापर्यंत 175 संस्थांनी सत्कार केला. त्याबद्दल काही सांगण्याची गरज वाटत नाही. अन्याय होईल तेव्हा आवाज उठवा आणि लढा द्या ही बाळासाहेबांनी शिकवण दिली आहे. एक नव्हे तर 50 जण एकत्र येतात आणि काम करतात हे महाराष्ट्राने पाहिले आहे. ज्यांना अश्रू कळतात त्यांच्यातच अश्रू पुसण्याची ताकद असते, असं ते म्हणाले.
राज्यात मविआ सरकार आले तेव्हा तुमचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी का आलं नाही? असा सवाल विचारला असता मुख्यमंत्रीपदासाठी माझं नाव होतं की नाही माहीत नाही. पण आम्ही आज हा निर्णय घेतला. मी मुख्यमंत्री असलो तरी पूर्वी सारखाच कार्यकर्ता आहे. अडीच वर्ष आम्ही खूप सहन केलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना तुमच्या चेहऱ्यावर तणाव जाणवत होता, असं विचालं असता, माझ्यावर 50 आमदारांची जबाबदारी होती. त्यामुळे मला टेन्शन येणं स्वाभाविक आहे. पूर्वीचे तीन दिवस माझ्यावर टेन्शन होतेय. आमचा प्रवास ठाणे ते विधानसभव आणि विधानभवन ते सुरत असा झाला, असंही ते म्हणाले.