महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट किती जागांवर लढणार? त्या बद्दल अजूनपर्यंत ठोस माहिती मिळत नव्हती. विविध अंदाज, तर्क-वितर्क लढवले जात होते. महायुतीमध्ये भाजपाच मोठा भाऊ ठरणार शिवसेना, राष्ट्रवादीला कमी जागांवर समाधान मानाव लागणार असं बोलल जात होतं. पण आता स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना किती जागांवर निवडणूक लढणार? मुंबईत किती जागा लढवणार? त्या बद्दल महत्त्वाची माहिती दिलीय. महाराराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भात पाच जागांवर मतदान झालं. आता पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात उमेदवारी अर्ज भरण्याचा सिलसिला सुरु आहे.
शिवसेना शिंदे गट एकूण 16 जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यात मुंबईत 3 जागांवर लढणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीयत. विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असून आम्ही 2019 मधला 42 जागा जिंकण्याचा रेकॉर्ड मोडू असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मविआने काय कारस्थान रचलेलं?
उद्धव ठाकरेंविरोधात बंड करुन एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत मिळून सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. येत्या जून महिन्यात मुख्यमंत्री म्हणून त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. “जून 2022 मध्ये सरकार कोसळण्याआधी महाविकास आघाडीने भाजपाचे आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याच कारस्थान रचलं होतं. भाजपाच्या काही आमदारांना फोडण्याच महाविकास आघाडीच प्लानिंग होतं” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाकरे कुटुंबातून कोण जास्त हस्तक्षेप करायचं?
“मुख्यमंत्री बनण्याच उद्धव ठाकरे यांचं स्वप्न होतं. महाविकास आघाडीची स्थापना हे सर्व पूर्वनियोजित होतं. वडिलांप्रमाणे किंग मेकर बनण्यात नाही, तर उद्धव ठाकरेंना किंग बनण्यात इंटरेस्ट होता. महाविकास आघाडीत मंत्री म्हणून काम करताना सतत अपमानास्पद वागणुकीचा अनुभव आला. ठाकरे कुटुंबाकडून खासकरुन आदित्य कामात हस्तक्षेप करायचा” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ‘राज्यसभेसाठी उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत डावलल्यानंतर अखेर संयम संपला’ असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.