मुंबई: नीती आयोगाच्या बैठकीनंतर सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) हे शेवटच्या रांगेत होते. त्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूने टीका करण्यात आली. विरोधकांनी तर या फोटोवरून शिंदे यांना लक्ष्यच केलं होतं. महाराष्ट्र सर्वाधिक महसूल केंद्र सरकारला देतो. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभं करण्यात आलं. हा महाराष्ट्राचा (maharashtra) अपमान आहे, अशी टीका विरोधकांनी शिंदे यांच्यावर केली होती. विरोधकांच्या या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. रांग महत्त्वाची नाही. काम महत्त्वाचं आहे, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी विरोधकांना प्रयत्युत्तर दिलं.
तुम्ही काल म्हणालात, नीती आयोगाच्या बैठकीत मी मागच्या रांगेत होतो. नीती आयोगाच्या बैठकीला मी गेलो होतो. त्यावरून तुम्ही टीका केली. मी मागच्या रांगेत उभे राहिल्याचं तुम्ही सांगितलं. पण या महत्त्वाच्या बैठकीत मी काय काय मागण्या केल्या आणि मुद्दे मांडले हे तुम्ही सांगितलं नाही. तेही सांगितलं असतं तर बरं वाटलं असतं. नीती आयोगाच्या बैठकीत मुद्दे मांडल्यानंतर केंद्राने हजारो कोटी रुपये आपल्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. तेही तुम्ही सांगायला हवं होतं, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्यावेळी मी पहिल्या रांगेत होतो. त्यामुळे नीती आयोगाच्या बैठकीनंतर फोटो काढताना मी तिसऱ्या रांगेत होतो याचा कमीपणा वाटण्याची गरज नाही. रांग महत्त्वाची नाही. काम महत्त्वाचे आहे ना. इकडे बसलेले एक से बढकर एक आहेत, असंही ते म्हणाले.
दिल्लीला मी जातो अशी टीका करतो. दिल्लीला तुम्ही जायचा. जावंच लागतं. तुम्ही शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. अरे बाबा तो मोगलांचा जमाना होता. पंतप्रधानांनी देशाचा डंका संपूर्ण देशात पिटवला आहे. इंदिरा गांधींचा मी फॅन होतो. त्यांनी चांगलं काम केलं. त्या डॅशिंग होत्या. मोदींची ट्रम्पशी चांगली दोस्ती आहे. ते ट्रम्पला कसे धरून चालायचे. जो बायडेन यांच्यासोबतही त्यांची चांगली मैत्री आहे. अमेरिका ही महासत्ता आहे. आता आपला देशही महासत्ता होणार आहे. तुम्हाला काही त्रास आहे? अशा माणसाला भेटायला जाणं तिथं रांग काय बघायची. बिलकूल नाही. आपल्याला काम पाहायचं आहे. त्यांनी सांगितलं आगे बढो. 100 दिवसांचा कार्यक्रम तयार करा. एक पैसाही कमी पडणार नाही, असं मोदींनी सांगितलं, असंही ते म्हणाले.
मी खातेवाटपासाठी गेलो नव्हतो. चांगल्या कामासाठी गेलो होतो. एक दिवस मला पंतप्रधान बनवा 370 कलम हटवू, राम मंदिर बांधू, असं बाळासाहेब म्हणायचे. तेच काम मोदींनी केलं ना. मग त्यांना भेटलं तर काय अडचण आहे? असा सवालही त्यांनी केला.