माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज राज्य सरकारला चांगलच धारेवर धरलं. सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही समाजाशी वेगवेगळी चर्चा केली हे चूक होतं. दोन्ही समाजाशी एकत्र संवाद साधायला हवा होता. तसं झालं असतं तर एवढा तणाव निर्माण झाला नसता, अशा शब्दात शरद पवार यांनी राज्य सरकारला फटकारलं होतं. पवार यांच्या या टीकेवरून राज्यात वादळ उठलेलं असतानाच खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आम्ही जे बोलतो ते जाहीरपणे बोलतो. आम्ही लपूनछपून करत नाही. आरक्षणाच्या संदर्भात आधी आमची जी भूमिका होती, तीच कायम आहे. कुणी कुणावर आरोप करू नये. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यावर सरकार बदललं. तेव्हा महाविकास आघाडीने हे आरक्षण टिकवलं नाही. जेव्ह जेव्हा विरोधकांना संधी होती तेव्हा तेव्हा त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. नेते झाले, राज्यकर्ते झाले. पण मराठा समाजाला वंचित ठेवलं. जेव्हा संधी होती तेव्हा दिलं नाही, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
आमचं सरकार पुन्हा आल्यावर आम्ही आरक्षण दिलं. कुणबी प्रमाणपत्रं दिली आहेत. योजनांचा लाभ देत आहोत. आरक्षण रद्द करण्याचा निर्णय झाला. तेव्हा पाच हजार लोकांच्या नोकरीचा प्रश्न रेंगाळला होता, आधीचे सरकार नोकरी देण्यास घाबरले. पण आम्ही नोकरी दिली. निर्णय घेतला, याकडेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधलं.
आमची जशी भूमिका आहे. तशी सर्वांनी भूमिका घेतली पाहिजे. राजकीय फायद्यासाठी कुणालाही वेठीस धरू नका. निवडणुका येतात जातात. कोणत्याही समाजाला आपल्या फायद्यासाठी वापरू नका, असं आवाहन करतानाच ओबीसींवर अन्याय करायचा नाही, ही भूमिका आमची काल होती, आजही आहे. सर्वांना खुलं आवाहन आहे. या. बसा. चर्चा करा. तुमच्या मागण्या सांगा. आपण अनेक प्रश्नावर काम केलं आहे. ज्यांना कुणाला चर्चा करायची आहे, जरांगे असतील किंवा ओबीसी नेते असतील किंवा राजकीय नेते असतील, सर्वांनी या. या प्रश्नात मार्ग काढला पाहिजे, असं ते म्हणाले.
लाडकी बहीण योजनेबाबत अफवा उठवल्या जात आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. या विरोधकांच्या वावड्या आहेत. विरोधकांना पोटदुखी झाली आहे. आम्ही जी लाडकी बहीण योजना सुरू केली, गॅस सिलिंडरची योजना सुरू केली, या सर्व योजना विरोधकांना हजम झाल्या नाहीत. त्यांना हजमोला दिला पाहिजे. हे सावत्र भाऊ आहेत. तुम्हाला पैसे मिळू नये, खोडा घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण सरकार म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे. आम्ही पैशाची तरतूद केली आहे. आम्ही निर्णय घेतल्यावर प्रिंटिंग मिस्टेक किंवा चुनावी जुमला म्हणत नाही. आम्ही महिला आणि ज्येष्ठांना एसटीतून सवलत दिली तेव्हा काय निवडणुका होत्या का? लाडक्या बहिणी आणि भावाने तुमचे विरोधक कोण आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.