मुंबई : मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घराबाहेर पडायचे नाही. कोरोना काळ असल्याने मातोश्रीतूनच त्यांचे कामकाज चालायचे. त्यानंतर त्यांना मानेचा त्रास उद्भवला. ते आजारी पडले. त्यांच्यावर सर्जरीही झाली. मानेच्या त्रासामुळे ते घराबाहेर पडत नव्हते. मानेला पट्टा लावून असायचे. उद्धव ठाकरे यांना मानेचा त्रास होत असल्याने नागपूरचे हिवाळी अधिवेशन मुंबईत झालं. उद्धव ठाकरे यांच्या या आजारपणावरून विरोधकांनी त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती. आता त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची खिल्ली उडवली आहे.
शिंदे गटाने काल मुंबईतील षण्मुखानंद सरस्वती सभागृहात अल्पसंख्याक समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून अल्पसंख्याक समाज आला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. जे विषय सोडवायचे ते पटकन सोडवणार आहे. जे धोरणात्मक निर्णय आहेत. तेही अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवणार आहे. बघत आहे, करत आहे. पाहात आहे हे मी करत नाही. होणारं असेल तर करून टाकतो. आधीचं सरकारही तुम्ही पाहिले. सर्व घरात बसले होते. एकनाथ शिंदे यांनी सर्वांना बाहेर काढलं आहे. सर्वजण फिरत आहेत. जागोजागी जात आहेत. कुणाचा कंबरेचा पट्टा निघाला, कुणाचा गळ्याचा पट्टा निघाला. सर्व निघालं. चांगलंय. चांगलंय. सर्व चांगलं आहे, अशी टीकाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
शिवसेनेने मंदिराबरोबरच मशिदीही वाचविल्या आहेत. साबिर शेख आमचे मंत्री होते. भारतात राहणारा मुस्लिम आपलाच आहे. देशभक्त आहे. पण भारतात राहून पाकिस्तानची वाहवा करणारा मुसलमान देशभक्त नाही, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. ते खरं ही आहे. आपल्या देशाचा अभिमान बाळगणारा मुस्लिम बांधव हा खरा देशभक्त आहे. हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती आणि त्याच विचारातून आम्ही काम करत आहोत, असं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आली. काही मुस्लिम बांधवांनी आषाढी म्हणून दुसऱ्या दिवशी बकरे कापले. ही चांगली गोष्ट आहे, असंही ते म्हणाले.
तुमचं आणि माझं रक्त सारखच आहे. जेव्हा आपण रक्तदान करतो तेव्हा ते हिंदूला जाईल की मुस्लिमांना जाईल हे आपण पाहत नाही. पण काँग्रेस आपल्यात फूट पाडत आहे. मुस्लिम समाज केवळ कुणावर तरी अवलंबून राहावा हेच काँग्रेसचं धोरण राहिलं आहे. त्यामुळे त्यापासून सावध राहा, असं आवाहनही त्यांनी केलं.
देशाबाबत सर्वांना अभिमान आहे. आपला देश महान देश आहे. आपल्या देशाची वेगळी ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जात पात धर्म पाहत नाही. त्यांनी आपल्या देशाचं नाव उंचावलं आहे. मोठमोठ्या देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. पण मोदींनी आपली अर्थव्यवस्था टिकवून ठेवली. तसेच आपली अर्थव्यवस्था वाढवली आहे, असंही ते म्हणाले.