नवी दिल्ली: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये भेटीगाठी आणि मेळावे घेतल्यानंतर एकनाथ शिंदे काल औरंगाबादमध्ये होते. औरंगाबादच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर ते आले आहेत. मात्र, काल संध्याकाळी औरंगाबादचा दौरा अचानक अर्धवट टाकून ते दिल्लीला रवाना झाले. शिंदे यांचा महिन्याभरातील हा सहावा दिल्ली दौरा होता. दिल्ली विमानतळावर त्यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा (amit shah) यांच्याशी भेट झाल्याचं वृत्त आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवर शिक्कामोर्तब करूनच शिंदे पहाटे 5 वाजता औरंगाबादेत परतले असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, शिंदे कालही दिल्लीला एकटेच गेले. त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) किंवा भाजपचा एकही नेता नव्हता. बुधवारीही मध्यरात्रीही शिंदे यांनी शहा यांची दिल्लीत भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. तेव्हाही ते एकटेच होते. फडणवीसांना टाळून शिंदे यांच्या फडणवीस यांच्यासोबत भेटी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळी 7 ते 7.30च्या सुमारास दिल्लीला पोहोचल्याचे सांगितले जात आहे. याचवेळी पंजाबचा दौरा आटोपून अमित शहा रात्री 9 ते 9.30च्या दरम्यान दिल्ली विमानतळावर आले. यावेळी शिंदे आणि शहा यांच्या टर्मिनल चारमध्ये भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये विमानतळावरच 45 मिनिटे चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचंही सांगितलं जात आहे.
शिंदे हे अमित शहांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली विमानतळाच्या व्हीआयपी झोनमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. शनिवारीच शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनीही 3 ऑगस्टच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा दावा केला होता. येत्या 1 ऑगस्ट रोजी शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तीन सदस्यांच्या खंडपीठाकडे या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. कोर्टाच्या निर्णयावरच शिंदे-फडणवीस सरकारच्या भवितव्यावर चर्चा होणार असल्याचं सागितलं जात आहे.
दरम्यान, दिल्लीतून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी उद्या गुड न्यूज देणार असल्याचं म्हटलं होतं. आज अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड या मतदारसंघात शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत अर्जुन खोतकर आणि सुरेश नवले हे दोन्ही माजी मंत्री शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या सभेतच शिंदे गुड न्यूज जाहीर करणार आहेत. त्यामुळे शिंदे आज मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख जाहीर करणार की वेगळी काही गुड न्यूज सांगतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.