ठाणे: टीम इंडियाने (team india) कालच्या सामन्यात पाकिस्तानवर (pakistan) रोमहर्षक विजय मिळवला. टीम इंडियाच्या या कामगिरीमुळे देशवासियांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) हे सुद्धा कालच्या सामन्यामुळे प्रभावित झाल्याचं पाहायला मिळालं. काल टीम इंडियाने एक मॅच जिंकली. तशीच मॅच आपण तीन साडेतीन महिन्यांपूर्वी जिंकलीय, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली.
ठाण्यात दिवाळी निमित्ताने दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच जोरदार फटकेबाजीही केली. टीम इंडिया जिंकली हा आनंदाचा क्षण आहे. तोही उत्सव आहेच. तुम्ही पाहिलं असेल मेलबर्नमध्येही बाळासाहेबांची शिवसेना झळकली. स्टेडियममध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पोस्टर झळकवण्यात आले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
कालची मॅच जिंकली. तशीच आम्ही तीन साडेतीन महिन्यापूर्वी एक मॅच खेळलो आणि जिंकली. या देशाने आणि महाराष्ट्राने पाहिली, अशी फटकेबाजी मुख्यमंत्र्यांनी करताच उपस्थितांनी त्यांना हसून दाद दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कामाचाही आढावा घेतला.
लोाकांच्या मनातील राज्य आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही आल्या आल्या आपली संस्कृती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. विकासाबरोबर या गोष्टी आवश्यक आहे. माणसाचं मन आनंदी असेल तर ऊर्जा प्रेरणा घेऊन आपल्याला पुढे जाता येतं. या राज्यात परिवर्तनाचं पर्व सुरू झालं आहे. हे विकासाचं पर्व असेल. या राज्याचा आपल्याला विकास करायचा आहे. जिथे जातो तिथे लोक उत्सफुर्त प्रतिसाद देत आहेत, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर भाष्य केलं. ग्रामपंचायतीच्या निकालात भाजपला 397 जागा मिळाल्या. शिवसेनेला 298 जागा मिळाल्या. आपले सरपंच निवडून आले. ही चांगली नांदी आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.