बीड | 5 डिसेंबर 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार आपल्या दारी कार्यक्रमावर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. आम्ही फक्त बोलत नाही. करून दाखवतो आणि केल्यावर बोलतो. काही लोक म्हणतात शासन आपल्या दारी बोगस कार्यक्रम आहे. इथे हजारो लोक उपस्थित आहेत. या व्यासपीठावरून अनेक लोक लाभ घेऊन गेले. जे अडीच वर्ष घरी बसले त्यांना काय कळणार शासन दारीचं महत्त्व? त्यांना काय कळणार शेतकऱ्यांच्या वेदना? ज्यांनी अडीच वर्ष घरात बसून बोगसगिरी केली. त्यांनी कार्यक्रमाला बोगस म्हणावं हा कार्यक्रमाला आलेल्या लोकांचा अपमान आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
बीडमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला केला. हा सामान्यांचा कार्यक्रम आहे. सामान्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आहे. हे सरकार आपलं आहे. आपल्या योजनांची अंमलबजावणी काटेकोर झाली पाहिजे त्यासाठी आपला आटापिटा आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना काय करावं ते सूचत नाही. मोठ्या संख्येने लोक कार्यक्रमाला येत आहेत. गेल्या आठवड्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीला दोन तृतियांश पूर्ण बहुमत मिळालं. ही त्यांची पोटदुखी आहे. ही पोटदुखी त्यांच्या छातीत धडकी भरवणारी आहे. आम्ही कामाने उत्तर देत आहोत. तुम्ही कितीही आरोप केले तरी आम्ही काम करतच राहणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं.
काल परवा जे निकाल लागले त्यातून मोदींची लाट पाहिली. मोदींचा करिश्मा संपला म्हणणाऱ्यांना मूँहतोड जवाब मिळाला आहे. आपल्याला केंद्राचं पाठबळ आहे. गेल्या नऊ वर्षात मोदींनी जे काम केलं ते गेल्या 50 ते 60 वर्षात आधीच्या राज्यकर्त्यांना दुर्देवाने करता आलं नाही. त्यामुळे कालच्या निवडणुकीत त्यांचा धुव्वा उडवला. त्यामुळे 2024च्या निवडणुकीत पुन्हा मोदीच यावर जनतेने शिक्कामोर्तब केलं आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
मोदींनी नऊ वर्षात एक तरी सुट्टी घेतलीय का? एक तरी दिवाळी त्यांनी कुटुंबासोबत साजरी केलीय? मोदींनी प्रत्येक दिवाळी सीमेवरील जवानांसोबत साजरी केली. असा पंतप्रधान या देशाला लाभला हे आपलं भाग्य आहे. त्यामुळे शासन आपल्या दारीच्या माध्यमातून जे आरोप करतील, जे आपली टिंगलटवाळी करतात त्यांना वेळ येईल तेव्हा योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांवर हल्ला चढवला. तुम्ही दुसऱ्या राज्यात का गेले? असं आम्हाला विचारलं जात होतं. तुम्हाला बाजूच्या घरात कोणी बोलवत नाही. आम्हाला तर दुसऱ्या राज्यात बोलवतात. तुमच्या पोटात का दुखतं? आता अजितदादांना घेऊन जाणार. म्हणजे दोन चार जागा अधिक वाढतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी मुंडे भावा बहिणीला एकत्र राहण्याचा सल्ला दिला. तुम्ही दोघे एकत्र राहा. आम्ही तुमच्यापाठीने ताकदीने उभं राहू. तुम्ही एकत्र राहिला तर बीडचं भलं होईल. परळीचं भलं होईल आणि महाराष्ट्राचंही भलं होईल, असंही ते म्हणाले.