मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांचा काल मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दसरा मेळावा (dussehra rally) पार पडला. दोन्ही मेळावे प्रचंड दणक्यात झाले. दोघांनीही शक्ती प्रदर्शनावर भर दिला होता आणि त्यात दोन्ही गट यशस्वी झाले आहेत. दोघांनीही आपल्या भाषणातून एकमेकांवर तोंडसुख घेतलं. त्यामुळे दोन्ही मेळावे चर्चेचा विषय ठरले. पण यात सर्वाधिक चर्चा होती स्टेजवरील रिकाम्या खुर्चीची. दोन्ही गटाच्या मेळाव्यात एक एक खुर्ची रिकामी ठेवली होती. त्यामुळे दोन्ही गटाच्या मेळाव्यात त्या रिकाम्या खुर्चीची जास्त चर्चा होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा पार पडला. या मैदानावर आल्यावर त्यांनी स्टेजवरील रिकाम्या खुर्चीला वाकून नमस्कार केला. शिवसेना प्रमुख बाळसााहेब ठाकरे यांच्या नावाने ही रिकामी खुर्ची ठेवण्यात आली होती. बाळासाहेबांची शेवटची सभा ठाण्यात झाली होती. त्यावेळी त्यांना बसण्यासाठी ही खुर्ची देण्यात आली होती.
तीच खुर्ची कालच्या मेळाव्यात ठेवण्यात आली होती. शिंदे यांनी या खुर्चीला अभिवादन केल्यानंतर 51 फूट तलवारीची पूजा केली. त्यासाठी उत्तर प्रदेशातील अयोध्येतून एका महंताला पाचारण करण्यात आलं होतं.
दुसरीकडे दादरच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांची रॅली होती. उद्धव ठाकरे यांच्या मंचावरही दोन खुर्च्या रिकाम्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील एक खुर्ची शिवसेना नेते संजय राऊत आणि दुसरी खुर्ची मनोहर जोशी यांच्यासाठी ठेवली होती.
संजय राऊत हे सध्या तुरुंगात आहेत. पत्राचाळ प्रकरणात त्यांना अटक झालेली आहे. तर, मनोहर जोशी कालच्या मेळाव्यात अनुपस्थित होते. मात्र, शिवसेनेने या दोन्ही नेत्यांसाठी खुर्ची खाली ठेवली होती.