CM Eknath Shinde : व्हिपचं उल्लंघन करणाऱ्यांवर नियमांनुसार कारवाई होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा; ठाकरे गटातील आमदारांची धाकधुक वाढली!

| Updated on: Jul 04, 2022 | 6:51 PM

व्हिप भरत गोगावले आहेत, तर गटनेता मी आहे. त्यामुळे विरोधात ज्यांनी मतदान केलं, म्हणजे व्हिपचं उल्लंघन, त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई होणार, असा इशाराच शिंदे यांनी दिलाय.

CM Eknath Shinde : व्हिपचं उल्लंघन करणाऱ्यांवर नियमांनुसार कारवाई होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा; ठाकरे गटातील आमदारांची धाकधुक वाढली!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : विधानसभेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन (Assembly Special Session) आज संपलं. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदारांना एकप्रकारे इशारा दिलाय. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मूळ शिवसेना पक्ष कोण आहे? आमच्याकडील आमदारांची संख्या आता 40 वर गेलीय. अजूनही काही येतील, ते नंतर. पण आज आम्ही बहुमतात आहोत. त्यामुळे व्हिप भरत गोगावले (Bharat Gogavale) आहेत, तर गटनेता मी आहे. त्यामुळे विरोधात ज्यांनी मतदान केलं, म्हणजे व्हिपचं उल्लंघन, त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई होणार, असा इशाराच शिंदे यांनी दिलाय.

‘हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे जातोय’

पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, काल आम्ही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली आणि त्यात बहुमताने ती निवडणूक जिंकली. आज सरकारवरचा विश्वासदर्शक ठरावही 164 विरुद्ध 99 असा जिंकला. त्यासाठी मी सभागृहात सर्व विधानसभा सदस्यांना धन्यवाद दिले आहेत. अधिवेशनाच्या बाबत उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे चर्चा करुन पुढची तारीख जाहीर करु. आमचं सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं आणि शिवसेना भाजप युतीच्या सरकारची सुरुवात झाली आहे. आमच्या गटाला देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा देण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतलाय त्याला हिंमत लागते. हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे जातोय. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे. पी. नड्डा यांचे आशीर्वाद लाभले आहेत. हे लोकांच्या मनातील, त्यांना अपेक्षित असलेलं सरकार आहे, असा दावाही शिंदे यांनी केलाय.

‘जनतेला अपेक्षित असलेली कामं आम्ही करु’

जनतेच्या मनातील जे काही असतं ते काही कालावधीनंतर पुर्णत्वास जातं. चांगली सुरुवात झाली आहे. लोकहिताचे निर्णय आम्ही घेतोय. आज आपण मेट्रोचं काम पाहतोय, त्याची काही कामं रखडली होती त्यावर चर्चा करुन आम्ही निर्णय घेतोय. या राज्यातील सर्व घटकाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतकरी, जलसंपदा विभागाची रखडलेली कामं आम्ही हाती घेत आहोत. या राज्याचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी सर्व सहकारी, विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन काम करु. जनतेचं सरकार आहे त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेली कामं आम्ही करु, असा विश्वासही शिंदे यांनी जनेतला दिलाय.

‘रखडलेले प्रकल्प लवकर पूर्ण करण्याकडे सरकारचा कल’

दोन घोषणा आम्ही केल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही पेट्रोल, डिझेलबाबतचा निर्णय घेतलाय. रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाला 21 कोटीचा निधी देत आहोत. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र यासाठी जलयुक्त शिवार योजनेबाबत फडणवीस यांनी आदेश दिले आहेत. रखडलेले प्रकल्प लवकरात लवकर कसे पूर्ण होतील याकडे आमचा कल आहे, असंही शिंदे यांनी स्पष्ट केलंय.