मुंबई: शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी 13 आमदारांसोबत बंड पुकारले आहे. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप आला आहे. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. तर आघाडी सरकारचं अस्तित्वही धोक्यात आलं आहे. त्यामुळे आघाडीचे सर्वच प्रमुख नेते खडबडून जागे झाले आहेत. त्यामुळे स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांवर शिंदे यांचं मन वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सरकारचं अस्तित्व धोक्यात आल्याने शिवसेनेने आपल्या खासदारांना मुंबईत बोलावलं आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडत असल्याचंही या निमित्ताने सांगितलं जात आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे परवाच दिल्लीत गेले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठकीसाठी ते दिल्लीत आले होते. काल विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही ते मुंबईत नव्हते. मात्र, आज शिंदे यांच्या बंडाची बातमी हाती आल्यानंतर शरद पवार सक्रिय झाले आहेत. पवारांनी आज आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. राज्यावर आलेलं संकट थोपवण्यासाठी या बैठकीत ते चर्चा करणार आहेत. त्यामुळे पवारांच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार फुटू नयेत म्हणून शिवसेनेच्या खासदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत सांगितलं जात नाही, तोपर्यंत मुंबई सोडू नका, असे आदेशच मुख्यमंत्र्यांकडून शिवसेना खासदारांना देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे किती खासदार ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मुंबईत परततात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, शिवसेनेसह राष्ट्रवादीनेही एकनाथ शिंदे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिववसेनेतील बड्या आणि बुजुर्ग नेत्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत, सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर हे शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी सक्रिय झाल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेचे काही नेते सुरतला जाऊन शिंदे यांची भेट घेणार असल्याचंही वृत्त आहे. या शिवाय शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशीही संपर्क साधला जात असल्याचं सांगितलं जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी तातडीने पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. सर्व आमदार आणि खासदारांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या संध्याकाळच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात त्यावरून शिवसेनेसोबत किती आमदार आहेत आणि शिंदेंसोबत किती आमदार आहेत हे स्पष्ट होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा सर्वचजण प्रयत्न करणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही शिंदे यांच्यासोबत बोलण्याची शक्यता आहे. मात्र, शिंदे त्यांना कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.