मुंबई : मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक प्रमुख महापालिका निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांच्या मागे सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत या दोन्ही विषयांवर महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. (CM Uddhav Thackeray and Sharad Pawar meeting at Varsha residence, Discussion on Central Investigation Agency)
महाविकास आघाडीतील अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, भावना गवळी अशा नेत्यांच्या मागे सध्या सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीचे शुल्ककाष्ट लागलेले आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, आता या यंत्रणांना न घाबरता त्यांच्याविरोधात एकत्रितपणे लढा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी घेतला आहे. त्याबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आता केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात रस्त्यावर उतरून विरोध करण्याचं आवाहन महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांना केलं आहे. भाजप दबावाचे राजकारण करत आहे. भाजपचे नेते रोज महाविकास आघाडीतील कोणत्या ना कोणत्या नेत्यावर आरोप करत आहेत. मी एकट्याने त्यांना उत्तर देण्यापेक्षा इतरांनीही बोललं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले होते.
राऊत यांच्या पाठोपाठ शिवसेनेते आमदार भास्कर जाधव यांनीही आक्रमक भूमिका घेतलीय. शिवसेनेतून खासदार संजय राऊत हेच भाजपवर हल्ला चढवत असल्याचे चित्र अशताना आता सर्व मंत्र्यांनी भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्याचं भास्कर जाधव म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी लागल्या आहेत. तसंच यंत्रणेच्या माध्यमातून मराठी अधिकाऱ्यांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे. या तपास यंत्रणा भाजपासाठी काम करत आहेत, असा आरोपही जाधव यांनी केलाय.
दरम्यान, जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी-विक्री व्यवहाराविरोधात पुरावे देण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्याबाबतचे पुरावे आपण ईडी आणि आयकर विभागाला देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं.
दरम्यान, किरीट सोमय्या हे ईडी कार्यालयात असताना दुसरीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात 20 ते 25 कार्याकर्त्यांनी सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
इतर बातम्या :
‘सरकार असो सहकार, स्वाहाकार हाच मंत्र’ हीच यांची घोषणा, जयंत पाटलांवर भाजपची जोरदार टीका
CM Uddhav Thackeray and Sharad Pawar meeting at Varsha residence, Discussion on Central Investigation Agency