मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केल्यानंतर तब्बल चौथ्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी मौन सोडलं. यावेळी त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या आमदारांबाबत पहिल्यांदाच बंडखोर असा शब्द वापरला. तसेच एकनाथ शिंदेंवरही त्यांनी घणाघाती टीका केली. आमदार संजय राठोड (sanjay rathod) यांच्या पाठी उभं राहिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच आमदारांचं जे बंड झालं त्यामागे भाजपच असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच माझ्यापेक्षाही बाळासाहेबांचं लाडकं अपत्य जर कोणतं असेल तर ते शिवसेना आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्याला सत्तेचा लोभ नाही, असं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. तसेच शिवसेना अजूनही मजबूत आहे. आणखी मजबूत करायची आहे, असं त्यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदेंसाठी काय नाही केलं? माझ्याकडची 2 खाती मी शिंदेंना दिली. शिंदे बडव्यांबद्दल बोलतात, ज्यांचा मुलगा शिवसेनाकडून खासदार आहे. शिंदेंसाठी मी काय कमी केलं?, असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा, असं आव्हानच त्यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे.
माझं मुख्यमंत्रिपद नाकारणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे, झाडं न्या, फांद्या न्या, पण मूळ तुम्ही नेऊ शकत नाही. हे सारं भाजपने केलं आहे, त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल. तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा. बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केलं. संजय राठोडांवर अनेक आरोप झाले. विचित्रं आरोप झाले. त्या काळातही मी त्यांना सांभाळून घेतलं, असं ते म्हणाले.
बाळासाहेबांचं माझ्याहूनही लाडकं आपत्य म्हणजे शिवसेना. ज्या शिवसेनेसाठी जीवही देईल असं जे म्हणायचे, तेच आज पळून गेले आहेत. जे निघून गेले. त्यांच्याबद्दल वाईट वाटत नाही. पण त्यांना मी काय कमी केलं होतं, असा भावनिक सवालही त्यांनी केला.
राठोडांचं त्याच वन खातं माझ्याकडे आलं. बाकी सगळे खाती मी वाटून दिली. पूर्वीची शिवसेना राहिली नाही असे सांगतात. त्यांना निष्ठा काय आहे हे दाखवून द्यावं लागेल. वामनराव हे पहिले आमदार होते. त्याच वक्तृत्व छान आहे. अनेक पराभव आले. आपण खचून गेलो नाही. शिवाजी महाराजांच्या वेळी निवडणूक नव्हत्या. थेट कापाकापी होती. हल्ले व्हायचे. बेचिराख केले जायचे. त्यावेळीही जनता, मावळा शिवरायांसोबत होते, असंही त्यांनी सांगितलं. हारजीत मनावर असते. मन खचलं असेल तर हरलेली निवडणूक जिंकता येते. बुडते ती निष्ठा तरंगते ती विष्ठा, असंही ते म्हणाले.