ठाणे : कल्याण आणि टिटवाळा येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक रुग्णालयांचा रविवारी (8 नोव्हेंबर) ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udav Thdhackeray) यांच्या उपस्थितीत ऑनलाईन हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महापौर विनिता राणे यांनी “कोरोना काळात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या डॉक्टर असण्याचा आम्हाला फायदा झाला”, असं मत मांडलं. महापौरांच्या या मतावर भाजप खासदार कपिल पाटील यांनी “मलाही माहित असतं तर मीदेखील एमबीबीएस झालो असतो. नंतर खासदार झालो असतो”, अशी मिश्किल टीप्पणी केली.
“जनतेचे काम करण्यासाठी डॉक्टर असण्याची आवश्यकता नाही. लोकप्रतिनिधी सर्वांसाठी काम करत राहतो”, असं कपिल पाटील म्हणाले. कपिल पाटील यांच्या या वक्तव्याला श्रीकांत शिंदे यांनीदेखील उत्तर दिले. “खासदार कपिल पाटील यांच्याच मतदारसंघात हे रुग्णालय सुरु होत आहेत. त्याचा त्यांनाच फायदा होईल. आम्ही काम करताना भेदभाव केला नाही. फक्त कर्तव्य पार पाडलं”, असं श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं.
दरम्यान, कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांनी एकमेकांना दिलेले शाब्दिक टोले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यादेखील लक्षात आलं. त्यावर त्यांनीदेखील मिश्किल प्रतिक्रिया देत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
“श्रीकांत तू एकटाच डॉक्टर आहेस. मी तरी कुठे डॉक्टर आहे? तरीसुद्धा मी बिना डॉक्टरचं इजेक्शन देतो. इंजेक्शन देता आलं पाहिजे. डॉक्टर नसलं तरी चालेल. पण तरीही जाऊद्या बाकी कुणी इंजेक्शन देऊ नका. नाहीतर मुख्यमंत्री म्हणाले म्हणून इंजेक्शन द्याल. हा एक गंमतीचा प्रकार आहे”, असं मुख्यमंत्री बोलताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
हेही वाचा : ‘कोश्यारी यांनी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी जाहीर करावी’, एकनाथ शिंदेंचं आवाहन