मुंबई : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसावरील अन्यायाला ‘मार्मिक’मधून वाचा फोडली. व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी तत्कालीन सरकारी आणि सरकारी व्यवस्थेला जेरीस आणण्याचं काम केलं होतं. अशा एकमेव व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्मिकचा 61 वा वर्धापन दिन आज साजरा झाला. हा संपूर्ण कार्यक्रमक दूरदृष्यप्रणालीद्वारे पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यास अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मार्मिकचे वाचक आणि शिवसैनिकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. (CM Uddhav Thackeray interacts with ShivSainiks on the occasion of the anniversary of ‘Marmik’)
भाषण करायची सवय आता जात चालली आहे. सभेची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो अशी व्हायची. या शिवाय सुरुवात होऊच शकत नाही. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे दूरदृश्यप्रणालीद्वारे आपण भेटत आहोत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचं शुक्लकाष्ट मागे लागलं आहे. त्यामुळे आपण कार्यक्रम असा साजरा करत आहोत. मार्मिकची सुरुवात आपल्याला ठाऊकच आहे. नव्या पिढीला ते कदाचित ठाऊक नसेल. मार्मिकबद्दल जे स्किट आता आपण पाहिले त्यावेळी प्रमोद नवलकरांची आठवण झाली. त्यांचा यात मोठा सहभाग राहिला आहे. मार्मिकने सगळ्यांनाच आत्मविश्वास दिला, असं मुख्यमंत्री म्हणाले.
नोकरी सोडा आणि व्यवस्यायाकडे वळा हे सांगणं सोप पण करणं कठीण असतं. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ते करुन दाखवलं. स्वत:चं व्यंगचित्र साप्ताहिक त्यावेळी सुरु करणं किती कठीण होतं. 13 ऑगस्ट हा मार्मिकचा वर्धापन दिन, आचार्य अत्रे यांची जयंती आणि बाबासाहेब पुरंदरे शंभरीत पदार्पण करत आहेत, असा एक योगायोगही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवला.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शिवसेनाप्रमुख आणि माझे काकाही मावळा या नावाने व्यंगचित्र काढत होते. तो लढा मुंबई घेऊन महाराष्ट्राने यशस्वी केला. त्यादेखील 61 वर्षे झाली. मराठी माणूस आळशी आहे असं कुणी म्हणत असेल, तो व्यवसाय करायला धजावत नाही असं कुणी म्हणत असेल. मात्र, मराठी माणूस लढ्यासाठी कधी मागेपुढे पाहत नाही. कुणी अन्याय करत असेल तर त्याच्या छाताडावर पाय देण्याची हिम्मत मराठी माणूस दाखवतो. ही हिम्मत आजही आहे, कालही होती आणि उद्याही असणार आहे. तर अशा पद्धतीनं संयुक्त महाराष्ट्र लढ्याचं ते आंदोलन यशस्वी झालं.
मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि शिवसेनाप्रमुखांनी, प्रबोधनकारांनी आणि माझ्या काकांनी एक विचार केला की सतत लढा लढा आणि लढा. मराठी माणसाच्या आयुष्यात एखादा विरंगुळा असावा असा विचार त्यांनी केला. आता आपण पाहतो की दुर्घटना असली की मोठी बातमी असते आणि चांगली बातमी एखाद्या कोपऱ्यात असते. अशा बातम्या आणि तेच तेच बघून त्यातून चेतना कशी मिळणार? त्या एका विचारातून मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकाचा जन्म झाला. सुरुवातीला त्याचं स्वरुप मराठी माणसाचं मनोरंजन करायचं असं होतं. पण पाहता पाहता एक गोष्ट लक्षात आली की मराठी माणसाच्या घरावर, त्याच्या हक्कावर परप्रांतिय गदा आणत आहेत. मग त्या मनोरंजनाची जागा मनोव्यथा व्यक्त करणाऱ्या झाल्या. अन्यायावर धारदार वार करणारी झाली. त्यातून एक चळवळ निर्माण झाली, लढा सुरु झाला, एक संघटना उदयाला आली आणि तिचं नाव शिवसेना.
आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून चांदा ते बांदा माझे शिवसैनिक मला स्क्रिनवर दिसत आहेत. ही मोठी चळवळ या व्यंगचित्रातून निर्माण केली गेली आहे. शिवसेना ही एकमेव अशी संघटना आहे जी एका व्यंगचित्रकाराने आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून जन्माला घातली आणि उभी केली आहे. पाहता पाहता तिची किर्ती ही महाराष्ट्र नाही, देश नाही तर जगभर पोहोचली. एका ब्रशचे फटकारे काय करुन दाखवू शकतात, याचं उदाहरण मला यापेक्षा तरी वेगळं आठवत नाही. एक नक्की की शिवसेनाप्रमुख व्यंगचित्रात ज्याला आपला गुरु मानायचे ते डेव्हिड लो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात न्यूझीलंडवरुन ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले आणि तिथून ते हिटलरवर फटकारे मारायचे. तेव्हा हिटलरने डेव्हिड लो यांना कुठल्याही पद्धतीनं ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. एका व्यंगचित्रकाराची ताकद काय असते हे डेव्हिड लो यांनी दाखवून दिलं होतं. (CM Uddhav Thackeray interacts with Shiv Sainiks on the occasion of the anniversary of Marmik)
व्यंचित्रात नुसत्या वेड्यावाकड्या रेघोट्या असून चालत नाहीत. व्यंग म्हणजे एखाद्याचं वेडंवाकडं चित्र काढणं नव्हे तर त्याच्या विचारातलं व्यंग, त्याचा व्यागणुकीतील व्यंग कमीत कमी रेषांमध्ये साकारणं हे व्यंगचित्रकाराची खरी कला, खरा गुण आहे. मी सुद्धा काही काळ मार्मिकमध्ये व्यंगचित्र काढली आहेत. पण आता गेली कित्येक दिवस झालं मी माझा कॅमेराही हातात घेऊ शकलो नाही, ब्रश आणि पेन्सिल माझ्या हातून सुटून तर कित्येक वर्षे झाली.
एक चित्रकार आणि व्यंगचित्रकार यातील फरक काय? उत्कृष्ट व्यंगचित्रकार हा पहिला उत्कृष्ट चित्रकार असलाच पाहिजे. पण उत्कृष्ट चित्रकार हा चांगला व्यंगचित्रकार असेलच असं नाही. व्यंगचित्रकाराला शरीरशास्त्र हे अवगत पाहिजेच. चेहरा आणि शरीर याचं प्रमाण त्याला कळलंच पाहिजे. म्हणजे चित्रकार किंवा चित्र याचा पुढचा टप्पा म्हणजे व्यंगचित्र. चित्रकार हा एक उत्तम प्रोट्रेट काढेल. पण व्यंगचित्रकार हा त्याच्या पलिकडे जातो. मला आठवतंय की, बाळासाहेबांनी सांगितलेल्या काही गोष्टी आहेत. ते जेव्हा फ्री प्रेस जर्नलमध्ये होते. इतर जे काही व्यंगचित्रकार होते. त्यातील एक व्यंगचित्रकार असा खूप विचार कर बसलेला होता की काय करायचं? काय करायचं? बाळासाहेब म्हणाले माझं काम झालं पण तो व्यक्ती अजून विचारच करत होता. लंच टाईम झाला त्यावेळी मी त्याला विचारलं की काय रे काय झालं. तेव्हा तो म्हणाला की मला नेहरु रडताना दाखवायचे आहेत. पण ते रडतानाचे संदर्भ नाहीत मिळत. तर नेहरु रडतानाचे संदर्भ कसे मिळणार? एकदा एक चेहरा, त्याची रचना कळाल्यावर त्याच्यात वेगवेगळे हावभाव दाखवणं हे व्यंगचित्रकाराचं खरं कसब आहे.
मला आजही आठवतंय की सामनाचा दसरा अंक होता. त्यात चित्र होतं की महिषासूरमर्दिनी आणि हातात तो त्रिशूळ होता आणि खाली पडलेले तेव्हाचे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. तेव्हा तो चित्रकार म्हणाला की या अँगलचा हेगडे यांचा चेहरा मिळत नाही. तेव्हा बाळासाहेबांनी तो कागद घेतला आणि एका मिनिटांत तो चेहरा काढून दिला. तर हे सगळं नसानसांत, धमण्यांमध्ये भिनलेलं असावं लागतं. आज मला खरंच समाधान वाटत आहे की माझंही वय 60 आहे, मार्मिकच्या बरोबरीचं. कारण, माझा जन्म 1960चा, संयुक्त महाराष्ट्राचा लढाही 1960चा आणि मार्मिकही 1960चं. माझं आणि मार्मिकचंही वय सारखं आहे. दोघांनीही महाराष्ट्राला आपलं नवीन रुप दाखवलं आहे. मार्मिक नव्या रुपात आलंय आणि मलाही तुमच्या आशीर्वादामुळे नवीन रुप धारण करावं लागलं आहे. मलाही कल्पना नव्हती की माझं हे नवीन रुप दाखवण्यात येईल. मी पदाच्या मागे लागणारा नाही. पण जबाबदारी आली तर त्यापासूळ पळ काढणाराही मी नाही. बाळासाहेबांनी मराठी माणसाला जे दिलं ते मलाही दिलं आणि ते घेऊनच मी मैदानात उतरलो आहे.
तेव्हाचा जो प्रेस होता तो खिळ्यांचा प्रेस होता. सगळी अक्षरं जुळवून त्याचं प्रुफरिडिंग व्हायचं. मग स्वत:चं मातोश्री मुद्रणालय आलं आणि आता सामनाचं मुद्रणालय आहे. अनेक संकटं येत असतात, पण संकटांवर विजय मिळवतो तो खरा मर्द असतो. ज्याच्या हातात शस्त्र नाही, ज्याच्याकडे शक्ती नाही त्याच्यावर वार करणं हे काही शौर्य नाही. तुल्यबळ लढत हे खरं शौर्य आहे. आणीबाणीच्या काळात एक विचित्र असं बंधन मार्मिकवर होतं. मार्मिकवर बंदी नव्हती पण मार्मिकच्या प्रेसला टाळं होतं. त्यावेळी मार्मिक छापायला कुणी तयार नव्हतं. त्याच्या वितरणाची जबाबदारी घ्यायला कुणी तयार नव्हतं. तेव्हा दिवाकर रावते हे अक्षरश: हातगाडीवरुन मार्मिक बाजारात घेऊ जायचे. तर हे सगळे साथी सोबती मार्मिकने तयार केले, उभे केले. रडायचं नाही तर लढायचं ही वृत्ती ही भावना मार्मिकने दिली. त्याच मार्मिकने शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेनेसाठी सामनाला जन्म घ्यावा लागला. आज शिवसेना आणि सामना काय करतोय हे संपूर्ण देश पाहतोय. सामनाचा अग्रलेख सर्व माध्यमांवर प्रसिद्ध केला जातो. ही सामनाची, शिवसेनेची ताकद आणि तिचा जन्मदाता हा मार्मिक. अशा या मार्मिकचं देणं आपण जपलं पाहिजे, मार्मिकला जपलं पाहिजे.
इतर बातम्या :
औरंगाबादेत युवासेनेच्या संवाद मेळाव्यात तुफान गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंघन, कारवाई होणार ?
पूरग्रस्तांच्या प्रश्नावरुन राजू शेट्टी आक्रमक, 22 ऑगस्टला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
CM Uddhav Thackeray interacts with Shiv Sainiks on the occasion of the anniversary of Marmik