मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) मतदान सुरू झालं. सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात झाली. 11.30 वाजेपर्यंत 187 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात भाजप, राष्ट्रवादी (ncp) आणि काँग्रेससह अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. मात्र, तीन तास होत आले तरी शिवसेनेच्या एकाही आमदाराने अजून मतदान केलं नाही. शिवसेना (Shivsena) समर्थक अपक्ष आमदारांनीही मतदान केलं नाही. शिवसेनेचे सर्वच आमदार विधानभवनात पोहोचून अर्धा तास लोटला आहे. पण तरीही आमदारांनी मतदान केलं नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ऐनवेळी मतांचा कोटा वाढवल्याने शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता विधानभवनात आले असून आपल्या आमदारांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेच्या सर्व आमदारांना आणि अपक्ष आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. आज राज्यसभेचं मतदान असल्याने सर्व आमदार सकाळी लवकरच उठले. काहींनी उठल्यावर योगा केला, तर काहींनी व्यायाम केला. तर काहींनी ध्यानधारणा केली. त्यानंतर सर्व आमदार तयार होऊन नाश्याताला एकत्र आले. कुणी मसाला डोसा, कुणी ऑमलेट तर कुणी इडली, डोश्यावर ताव मारला. त्यानंतर काही आमदारांनी मीडियाशी संवादही साधला. इतक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मतांचा कोटा वाढवल्याची बातमी आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारासाठी 42 ऐवजी 44 मतांचा कोटा ठरवल्याची बातमी धडकली. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या गोटात एकच खळबळ उडाली.
या वृत्तानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी आमदारांना समजावण्याचा प्रयत्न केला. स्वत: संजय राऊत आणि विनायक राऊत हॉटेलात आले. त्यांनी आमदारांशी संवाद साधला. त्यानंतर सर्व आमदार विधानभवनाच्या दिशेने जायला निघाले. हाकेच्या अंतरावरच विधानभवन असल्याने पायीच जात शक्तीप्रदर्शन करायचं ठरलं. तर अब्दुल सत्तार यांनी गाडीने जायचं ठरलं. यावेळी शिवसेना आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. जय भवानी, जय शिवाजीचा जयघोषही झाला. त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार एकत्रित मतदान करणार असं चित्रं दिसत होतं.
शिवसेना आमदार घोषणा देतच विधान भवनात आले. पण मतदान कक्षाकडे फिरकलेच नाही. या आमदारांना थांबायला सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफाही विधानभवनात आला. मुख्यमंत्र्यांनी आमदारांशी चर्चा सुरू केली आहे. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी पहिल्या पसंतीची दहा मते देणार असल्याचं वृत्त धडकलं. मात्र, तरीही अजून शिवसेना आमदारांचं मतदान सुरू झालेलं नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.