मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाच्या विरोधात बंड केले आहेत. शिंदे यांच्यासोबत 50 आमदारांनीही बंड केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच शिंदे यांच्या गटाने आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला आहे. तसेच शिवसेनेच्या (shivsena) निवडणूक चिन्हावरच दावा केला आहे. त्यामुळे पक्षाच्या अस्तित्वालाच धोका पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल पाच दिवसानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक होत आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख, खासदार, आमदार आणि नगरसेवकांशी गेल्या दोन दिवसात संवाद साधला आहे. आपलं म्हणणं मांडतानाच त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं आहे. आपल्यासोबत काही आमदार सोडून सर्व पक्ष असल्याचं स्पष्ट झाल्याने उद्धव ठाकरे आश्वस्त झाले आहेत. त्यामुळे आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेच्या आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीत काही मुत्सद्दी निर्णय घेतले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांची कोंडी करण्यासाठी हे निर्णय घेतले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. एक म्हणजे शिंदे यांची पक्षाच्या नेतेपदावरून आणि ठाणे जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी केली जाण्याची शक्यता आहे. ही हकालपट्टी करताना त्यांचं पक्षाचं सदस्यत्व कायम ठेवलं जाणार आहे. कायदेशीर पेच निर्माण होऊ नये आणि शिंदे यांच्या हातात कायदेशीर पळवाटांचं कोलित मिळू नये म्हणून हा निर्णय घेण्यात येणार आहे. शिंदे यांच्याकडून ठाणे जिल्हाप्रमुख पद काढून त्याची जबाबदारी अन्य नेत्याकडे देण्याचा किंवा हे पद काही काळापुरतं रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. ठाण्यात कोण आपल्यासोबत आणि कोण शिंदेंसोबत असतील याचा अंदाज घेऊनच हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या आमदारांना पक्षातून देण्यात आलेली पदे काढून घेण्यात येतील. मात्र, त्यांचेही पक्षातील सदस्यत्व कायम ठेवलं जाणार आहे. इथेही कायदेशीर पेच निर्माण होऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे. या बैठकीतून पक्ष आपल्याच पाठी उभा आहे. आमचीच शिवसेना अधिकृत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्नही उद्धव ठाकरे आज करणार आहेत.
शिंदे यांच्या बंडाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे पक्षात भाकरी फिरवण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे ज्या ज्या आमदारांनी बंड केलं. त्यांच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात पक्षाच्या पदावर नव्या लोकांची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. तसेच या बंडखोर आमदारांच्या समर्थकांची पक्षाच्या पदावरून हकालपट्टी केली जाण्याची शक्यता आहे. तसेच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबादाऱ्या देण्यात येणार आहेत.
राज्यातील राजकीय परिस्थितीवर वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी आणि पक्षाची बाजू भक्कम राहावी म्हणून पक्षातील कायदेशीर बाबींची माहिती असणाऱ्या नेत्यांकडे काही जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच पक्षाची अधिक पडझड होऊ नये म्हणूनही काही नेत्यांवर जबाबदारी दिली जाणार असून त्यांना बंडखोरांच्या जिल्ह्यात आणि तालुक्यात जाऊन पक्षाच्या स्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
शिवसेनेत उभी फूट पडली आहे. 50 आमदार आणि दोन खासदार शिंदे यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आता पुढे काय करायचे यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन बाजूला व्हायचे की विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यापर्यंत वाट पाहावी यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.