मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भर विधानसभेत भाजपला उद्देशून निर्लज्ज या शब्दाचा वापर केला. हा शब्द असंसदीय आहे. तरीही मी तो उच्चारतो असं सांगत मुख्यमंत्र्यानी भाजपला आव्हानच दिलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या शब्दाला आक्षेप घेऊन हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावून आले आणि मुनगंटीवारांच्या मुद्द्यातीलच हवा काढली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ झाला होता. मात्र, एव्हाना वेळ निघून गेल्याने निर्लज्ज या शब्दावरून भाजपला साधा निषेधही नोंदवता आला नाही. (cm uddhav thackeray using unparliamentary word, uproar in maharashtra assembly)
राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सभागृहात जोरदार बॅटींग केली. मुख्यमंत्र्यांनी एकेका शब्दातून विरोधकांना घायाळ केलं. हिंदुत्वापासून युतीपर्यंतचे सर्व मुद्दे मांडून मुख्यमंत्र्यांनी भाजपचा हल्ला परतवून लावला. यावेळी त्यांनी भाजपला थेट निर्लज्ज संबोधलं. बाळासाहेबांची आठवण तुम्ही वेळोवेळी काढली… त्यांना विसरला नाहीत. धन्यवाद. पण त्यांचे हिंदुत्व तरी विसरू नका. बाबरी पाडतांना येरेगबाळे पळून गेले… बाळासाहेब राहिले होते. शिवसेनाप्रमुखांनी म्हटलं, जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मलाअभिमान आहे. आणि हे म्हणाले आम्ही बाबरी नाही पाडली, असा टोलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.
‘निर्लज्ज’ हा असंसदीय शब्द, तरी वापरतो
तुम्हाला आज बाळासाहेबांचे उमाळे येत आहेत. त्याच बाळासाहेबांच्या खोलीत भाजपचे नेते अमित शहा आणि आमच्यात चर्चा झाली. पुढच्या वाटचालीची चर्चा केली. तेव्हा देवेंद्र फडणवीसांना दाराबाहेर ठेवलं होतं. आतमध्ये मी आणि शहा होतं. तेव्हा देवेंद्र तरी निर्लज्जपणाने आत ठरलेली गोष्ट बाहेर नाकारता, हे तुमचे हिंदुत्व? निर्लज्ज हा शब्द असंसदीय असला तरी मी तो वापरतो… हेच तुमचं हिंदुत्व… हेच तुमचं बाळासाहेबांवरचं प्रेम?, असा सवाल करतानाच बाळासाहेबांची खोली तुमच्यासाठी एखादी खोली असू शकते, पण आमच्यासाठी ते मंदिर आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे फडणवीसांना उद्देशून म्हणाले.
मुनगंटीवारांचा आक्षेप
मुख्यमंत्र्यांनी थेट भाजपला उद्देशून निर्लज्ज हा शब्द वापरल्याने त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. त्यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. त्याला सत्ताधाऱ्यांनी विरोध केला. तरीही या गोंधळात मुनगंटीवार यांनी त्यांचा हरकतीचा मुद्दा मांडला. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा जो उल्लेख केला तो रेकॉर्डवर येणं योग्य नाही. यावेळी त्यांनी दुसरा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात भास्कर जाधव यांनी पॉईंट ऑफ प्रोसिजर उपस्थित करून मुनगंटीवारांच्या मुद्द्यातील हवा काढून घेतली. अभिनंदन प्रस्तावाची सुरुवात सुनील प्रभू यांनी उपस्थित केली. हा विरोधी पक्षाचा ठराव नाही. त्यावर विरोधी पक्षानेही आपली मते मांडली आहेत. सभागृहाचे नेते मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर दिलं आहे. आता त्यावर कोणतीही चर्चा होणार नाही. होऊ शकत नाही. विरोधकांना मुख्यमंत्री बोलल्यानंतर नियमानुसार बोलण्याचा अधिकार नाही, असं जाधव म्हणाले.
फडणवीस-जाधव जुंपली
त्यानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला. त्यानंतर अध्यक्षांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्ताव मताला टाकला आणि तो मंजूर केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उभे राहिले. जाधव यांनाच नियमांचं पुस्तक माहीत आहे आणि आम्ही ते कधी वाचलंच नाही असं त्यांनी कधी समजू नये. ते हुशार आहे. आम्हीही नियमांचं पुस्तक वाचलं. सुधीरभाऊ राईट ऑफ रिप्लायवर उभे नाहीत. ते हरकतीच्या मुद्द्यावर उभे आहेत. हरकत कधीही ठरवता येते. ती हरकत आहे की नाही. हे जाधव ठरवणार नाही. ते अध्यक्ष ठरवतील. अध्यक्षांनी ती हरकत ऐकून घ्यायची असते आणि ती योग्य आहे की नाही हे ठरवायचे असते. जरा समज द्या त्यांना, असं फडणवीस म्हणाले.
जाधव यांचा युक्तीवाद
फडणवीस खाली बसताच पुन्हा जाधव यांनी पॉईंट ऑफ ऑर्डर उपस्थित करून फडणवीसांच्या हरकतीला आक्षेप घेतला. आता मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर तुम्ही पीठासीन अधिकारी म्हणून हा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे आता त्यावर कुणालाही बोलता येणार नाही. त्यावर मतं मांडता येणार नाही. हाच माझा हरकतीचा मुद्दा आहे, असं जाधव यांनी ठासून सांगितलं. (cm uddhav thackeray using unparliamentary word, uproar in maharashtra assembly)
राऊतांचं निवेदन आणि विरोधकांचा गोंधळ
त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी इतर कामकाजास सुरुवात केली. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना मुंबईतील ब्लॅकआऊट बाबतचं निवेदन मांडण्यास सांगितलं. राऊत बोलत असताना सभागृहात प्रचंड गोंधळ सुरू होता. विरोधक वारंवार घोषणाबाजी देत होते. भाजपच्या महिला आमदारांचीही घोषणाबाजी सुरू होती. राऊत यांचं निवेदन संपेपर्यंत विरोधकांच्या घोषणा सुरूच होत्या. राऊतांचं निवेदन वाचून होताच विरोधकांच्या घोषणाही थांबल्या. (cm uddhav thackeray using unparliamentary word, uproar in maharashtra assembly)
LIVE: महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/PriMbgv1GS
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 3, 2021
संबंधित बातम्या:
नारायण भंडारी, माधव भंडारी, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख आणि फडणवीसांची दिलगिरी
(cm uddhav thackeray using unparliamentary word, uproar in maharashtra assembly)