मुंबई: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी देशभरातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी (sonia gandhi), राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बैठकीचं निमंत्रण दिलं आहे. तसेच भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही या बैठकीला बोलावलं आहे. येत्या 15 जून रोजी ही बैठक होणार आहे. मात्र, या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray)उपस्थित राहणार नाहीत. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊतही या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. खुद्द संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून ते तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैरवापरावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. ममता बॅनरी्जी यांनी एक बैठक बोलावली आहे. देशभरातील विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षांचे प्रमुख नेत्यांची बैठक ममतादीदींनी बोलावली आहे. त्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना आलं आहे. आम्ही त्या दिवशी अयोध्येत आहोत. त्यामुळे आम्ही या बैठकीला जाणार नाही. मुख्यमंत्रीही या बैठकीला जाणार नाही. उद्धव ठाकरे या बैठकीला काही कारणांमुळे उपस्थित राहणार नसले तरी या बैठकीला शिवसेनेचा कोणी तरी एक प्रतिनिधी पाठवला जाणार आहे. आमचा प्रतिनिधी 15 जून रोजी या विरोधी पक्षांच्या बैठकीला हजर राहणार आहे, असं राऊत म्हणाले.
मी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्याशी या बैठकीबाबत चर्चा केली. आमच्यापैकी एकजण या बैठकीला येणार असल्याचंही त्यांना सांगितलं. विरोधी पक्षनेत्यांच्या या बैठकीत इतरही चर्चा होणार आहे. तपास यंत्रणांचा होत असलेल्या दुरुपयोगावरही चर्चा होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
येत्या 15 जून रोजी दुपारी 3 वाजता नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक होणार आहे. येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्याबाबत विरोधी पक्षाच्या बैठकीत चर्चा होणार असून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवला जाणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून कुणाचे नाव जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोरोना संकटानंतर विरोधी पक्षांची पहिल्यांदाच नवी दिल्लीत बैठक होत आहे. विशेष म्हणजे ही बैठक काँग्रेसने बोलावलेली नाही. तृणमूल काँग्रेसने ही बैठक बोलावली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचं नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्याकडे जाणार की काय अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.