मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोणत्याही सण-समारंभांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोराना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलंय. तसंच केंद्र सरकारनंही या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काही राजकीय पक्ष दहीहंडी साजरी करत आहेत, त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता, माझं काही म्हणणं नाही. समजदार नागरिकांना वेगळं सांगण्याची गरज नाही, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. (CM Uddhav Thackeray’s criticism on BJP and MNS)
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर गोकुळअष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत आरोग्य उत्सव साजरा करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यांनी केलं होतं. त्याला प्रतिसाद देत संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने दहीहंडी उत्सवाचं आयोजन न करता आरोग्य उत्सव आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन ऑक्सीजन प्रकल्पांची उभारणी करण्याचं निश्चित करण्यात आलं. त्यापैकी पहिल्या मीरा भाईंदरच्या प्रकल्पाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच करण्यात आलं होतं. आज ठाणे शहरातील दुसऱ्या प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक, आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही, हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे, असा टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि मनसेला लगावलाय.
दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची मला जाणीव आहे. तो थरार, ते उधाण मला अजूनही आठवते. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. 90 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनेची ओळख. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे एक वेगळं नातं आहे. त्यामुळेच शिवसेनेबद्दल लोकांना, ठाणेकरांना वाटणारा विश्वास आजही कायम असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
आज प्रताप सरनाईक कोरोना विरोधात जे आंदोलन करताहेत, तसे करण्याची गरज आहे. पण दुर्देवाने तेवढी प्रगल्भता इतर काही लोकांमध्ये दिसत नाही. आपल्या बेशिस्त वागणूकीतून ते शिस्त पाळणाऱ्या लोकांचे जीवन ही अडचणीत आणत आहेत. चांगल्या कामासाठी नेहमीच निधी मिळाला आहे. या पुढेही निधी मिळेल याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. अनेकजण तारीख पे तारीख जाहीर करतात, प्रत्यक्षात काही करत नाहीत. पण पंधरा दिवसापूर्वी तारीख ठरवून जनतेचे प्राण वाचवण्यासाठी प्राणवायूचा प्रकल्प सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून आमदार प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन करण्यात आले.
इतर बातम्या :
VIDEO: जुन्या महापौर बंगल्यावर बिल्डरांची वर्दळ, कामं वाजवली जाताहेत; राज ठाकरेंचा हल्लाबोल
CM Uddhav Thackeray’s criticism on BJP and MNS