मुंबई : प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गेल्या पाच वर्षातील अनियमिततेची गंभीर दखल घेत बँकेच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात दरेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. ज्या बँकेला ऑडिटरने A ग्रेड दिली आहे, अशा बँकेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने का घेतला आहे, असा सवाल आज प्रवीण दरेकर यांनी केला होता. त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलं आहे.
सहकार विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार ही चौकशी करण्यात येत आहे, असं स्पष्ट करत यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही, असं बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं. मुंबै बँकेसंदर्भात तक्रार आल्याने चौकशीचे आदेश देण्यात आले एवढीच गोष्ट आहे, असं पाटील म्हणाले.
सहकार विभागाकडे अनेक तक्रारी येत असतात. अशीच एक तक्रार मुंबई बँके संदर्भात आली होती. यावर जी चौकशी समिती गठित करण्यात आली होती तिने जो अहवाल दिला त्या अनुषंगाने राज्याच्या सहकार विभागाने ही कारवाई केली आहे. कोणत्याही राजकीय सूडबुद्धीने प्रेरित अशी ही कारवाई नाही, असं सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
मुंबै बँकेची चौकशी लावल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी आक्रमक अंदाजात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर टीकेचे बाण सोडले. मुंबै जिल्हा बँकेला विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार पण आता राष्ट्रवादीने देखील पुढच्या सामन्याला तयार रहावं. A ग्रेड असलेल्या मुंबै बँकेची चौकशी का?, असा प्रमुख सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. तसंच यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर अनेक आरोप केले. याविषयी सहकारमंत्र्यांना विचारलं असता, प्रवीण दरेकर काय बोलले याबाबत मला कल्पना नाही, असं म्हणत राजकीय टोलेबाजी करण्याचं सहारमंत्र्यांनी टाळलं.
राज्य सरकारकडून जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची बँकेच्या चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार कायद्याच्या कलम 83 नुसार तीन महिन्यांत चौकशी अहवाल देण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी दिले आहेत.
राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात दरेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. सरकारने घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी घेतलेला आहे. अशा चौकशांना मी घाबरत नाही, भीकही घालत नाही. राजकारणापोटी आर्थिक संस्थेला वेठीस धरु नका, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
मुंबै जिल्हा बँकेला विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार पण आता राष्ट्रवादीने देखील पुढच्या सामन्याला तयार रहावं. कारण महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सगळ्या जिल्हा बँकांच्याविरोधात मी ईडी, सीबीआय आणि केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले.
ही एकट्या प्रवीण दरेकरांची बँक नाहीय. यात राष्ट्रवादीचे 6 संचालक आहेत. यामध्ये शिवाजीराव नलावडे, अजितदादांच्या जवळचे सहकारी सिद्धार्थ कांबळे या बॅंकेत आहेत. तसंच सुनील राऊत, अभिषेक घोसाळकर हे देखील आहेत. मग कारवाई झाली तर केवळ प्रवीण दरेकरांविरोधात होणार नाही. तशी सुतराम शक्यतानाही नाही. पण केवळ द्वेषाचं राजकारण करायचं म्हणून मुंबै बँकेची चौकशी सुरु केलेली आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
(Co Operation Minister balasaheb patil Answer pravin Darekar over Mumbai Bank Inquiry)
हे ही वाचा :
मुंबै बँकेच्या चौकशीचे आदेश, दरेकर म्हणतात, 6 संचालक राष्ट्रवादीचे, ते ही अजित पवारांच्या जवळचे!