नवी दिल्ली: देशातील प्रत्येक निवडणुकीत सातत्याने होणारा पराभव. त्यानंतर पक्षातील बड्या नेत्यांची नाराजी आणि सोडचिठ्ठी या सर्व टेन्शनमधून काँग्रेस (congress) बाहेर पडत नाही तोच काँग्रेसला पुन्हा एक झटका बसला. हार्दिक पटेल सारखा तरुण नेता, कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझादांसारखे (ghulam nabi azad) पक्के काँग्रेसी नेते काँग्रेसला सोडून गेले. त्यामुळे काँग्रेसची चांगलीच वाताहत झाली आहे. या सर्व पडझडीनंतरही काँग्रेस उभे राहताना दिसत आहे. येत्या 7 सप्टेंबरपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू होत आहे. या यात्रेत 177 नेते सामिल होणार आहेत. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते या यात्रेत सहभागी होणार असून त्यातील दोन नावे मात्र सर्वाधिक चर्चेत आहेत. एक म्हणजे कन्हैय्या कुमार आणि पवन खेडा यांचं. या दोन्ही नेत्यांचा काँग्रेसने आपल्या यादीत समावेश करून तरुण नेत्यांवर पक्षाने अधिक फोकस ठेवल्याचे संकेतही दिले आहेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही भारत जोडो यात्रा सुरू करण्यात येणार आहे. तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून या रॅलीला सुरुवात होणार आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातून ब्रेक घेऊन राहुल गांधी या यात्रेला अधिकाधिक वेळ देणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. या यात्रेत कन्हैय्या कुमार, पवन खेडा आणि माजी मंत्री विजय इंदर सिंगला यांचाही समावेश होणार आहे. तसेच युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष केशव चंद्र यादव आणि उत्तराखंड काँग्रेसचे दूरसंचार विभागाचे सचिव वैभव वालिया यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांचे नावही या 117 नेत्यांच्या यादीत सामील आहे.
150 दिवस ही यात्रा चालणार आहे. कन्याकुमारीपासून ही यात्रा सुरू होऊ काश्मीरपर्यंत चालणार आहे. काश्मीरला या यात्रेचा समारोप होणार आहे. देशातील एकूण 12 राज्यातून ही यात्रा जाणार आहे. काही केंद्रशासित प्रदेशातूनही ही यात्रा जाणार आहे. एकूण 3500 किलोमीटरचा पायी प्रवास या निमित्ताने केला जाणार आहे.
80 वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात आणि प्रेरणेने भारतीय काँग्रेसने भारत छोडो आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर पाच वर्षानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. आता काँग्रेस पुन्हा तीच यात्रा सुरू करत आहे, असं काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी सांगितलं.
भय, कट्टरता आणि पूर्वग्रहदूषितपणाने करण्यात येणार राजकारण याच्याविरोधात ही यात्रा काढण्यात आली आहे. बेरोजगारी, आर्थिक संकट आमि वेगाने वाढणारी असमानता याला पर्याय देण्यासाठीच ही भारत जोडो यात्रा आहे, असंही रमेश यांनी सांगितलं.
दरम्यान, राहुल गांधी यांनी 150 सिव्हिल सोसायटी संघटनांसोबत बैठक घेतली होती. यावेळी या सामाजिक संघटनांनी काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. योगेंद्र यादव, अरुणा राय, सैयदा हमीद, पीव्ही राजगोपाल, बेजवाडा विल्सन, देवनुरा महादेवा, जीएन देवी यांनीही काँग्रेसच्या या यात्रेला पाठिंबा दिला आहे.