नवी दिल्ली: गेल्या आठ वर्षापासून केंद्राच्या सत्तेपासून दूर राहिल्यानंतर आता काँग्रेसने (congress) पक्ष बांधणीला आणि पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे. या यात्रे दरम्यान राहुल गांधी हे 3570 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. या यात्रेत राहुल गांधी यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. यात्रेत कुर्ता पायजमा घालण्याऐवजी ते टी शर्ट आणि पँटमध्ये दिसत आहेत. मात्र, यात्रेपेक्षा लोकांचं त्यांच्या बुटाकडे लक्ष वेधलं गेलं आहे. त्यांचे बूट पाहून काहींनी तर त्या बुटाची किंमत किती आहे हे काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर, भाजपने (bjp) त्यांच्या टी-शर्टची किंमत सांगून लोकांच्या उत्सुकतेला हवा देण्याचं काम केलं आहे.
भाजपने आपल्या ट्विटर हँडलवर राहुल गांधी यांचा टी शर्ट घातलेला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत बाजूला तशाच टी-शर्टचा फोटोही पोस्ट केला आहे. तसेच तो टी-शर्ट कोणत्या ब्रँडचा आहे आणि त्या टी-शर्टची किंमत किती आहे हे सुद्धा त्यात लिहिलं आहे. राहुल गांधी यांनी ब्रिटिश लग्जरी फॅशन ब्रँड Burberryचा पोलो टी-शर्ट घातला आहे. त्याची किंमत 41 हजार 257 रुपये आहे, असं भाजपच्या ट्विटमधून स्पष्ट होतं. तसेच भारत, पाहा, असं ट्विट करून भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपच्या या ट्विटनंतर राहुल गांधी यांच्या बूट आणि टी-शर्टवरून अधिकच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. या यात्रे दरम्यान, राहुल गांधी यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजप आणि संघावर टीका केली. भाजप आणि संघाची विचारधारा द्वेष पसरवणारी आहे. आमची यात्रा ही भाजप आणि संघाच्या विरोधात आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
Bharat, dekho! pic.twitter.com/UzBy6LL1pH
— BJP (@BJP4India) September 9, 2022
राहुल गांधी यांनी यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नाही. लवकरच निवडणुका होणार आहेत. त्यात सर्व काही माहीत पडेल. मी निर्णय घेतला आहे. माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.