महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला रंगत येत आहे. कारण प्रचारांचा तोफा सुरु झाल्या आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराला लागले आहेत. यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका-टीप्पणी, खिल्ली उडवण्याच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. राजकारणात या गोष्टी होणं साहजिकच आहे. कारण या वेळची विधानसभा निवडणूक वेगळी आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात राजकारणात प्रचंड उलथापालथ झाले आहेत. दोन पक्षांत उभी फूट पडली आहे. त्यामुळे दोन पक्षांचे रुपांतर आता चार पक्षांमध्ये झाले आहेत. तसेच भाजप आणि काँग्रेस हे पक्षदेखील आहेत. त्या पक्षांमधील अंतर्गत कलह आणि गटबाजीसुद्धा आहे. बंडखोरी देखील आहे. यामुळे या निवडणुकीत प्रचंड ट्विस्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाचं या निवडणुकीच्या घडामोडींकडे बारकारईने लक्ष आहे. असं असताना आज तुळजापुरात काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी गाण्याचे सूर छेडत भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला.
काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी तुळजापूरमधील प्रचारसभेत गाणी म्हणत राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर टीका केली. “लोकसभेला घड्याळ घेऊन उभे होते. आता कमळ घेऊन उभे आहेत. त्यामुळे लोक आता म्हणत आहेत पाटील गावाकडे चला”, असा टोला अमित देशमुख यांनी लगावला. “यावेळी ते मत मागायला आले की तुम्ही त्यांना म्हणा, मुझको राणाजी माफ करना गलती थारेसे हो गई”, असं गाणं म्हणत अमित देशमुख यांनी राणा पाटील यांच्यावर टीका केली.
“स्वर्गीय विलासराव देशमुख की बात पर शरदचंद्र पवार की बात पर उद्धव ठाकरे की बात पर मत देना काँग्रेस के हातपर”, असे यमक जुळवून देशमुख यांनी तुळजापूरमधील उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले. अमित देशमुख धीरज पाटील यांच्या सभेसाठी तुळजापुरात आले असताना जाहीर सभेतच त्यांनी गाणे आणि शायरी म्हणत भाजपवर टीका केली. त्यामुळे उपस्थित लोकांना काही काळ विलासराव देशमुख यांची आठवण आल्याचा प्रत्यय येत होता.