लोकसभा निवडणुकीच्यावेळी महाविकास आघाडीने दमदार काम केलं. पण आता विधानसभा निवडणुकीला मविआमध्ये मुख्यमंत्रीपद आणि जागा वाटपावरुन विसंवाद दिसू लागलाय. आज खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत ते दिसून आलं. “काँग्रेसला लोकसभेत तीन जागा जास्त मिळालेल्या आहेत. पण त्यामुळे जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा अजून काही आहोत, उंच भाऊ आहोत, तर त्यांना सांगू इच्छितो की त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचे योगदान किती याचा त्यांनी अभ्यास करायला हवा” असं संजय राऊत म्हणाले. “अमरावती, रामटेक , कोल्हापूर या जिंकलेल्या जागा आम्ही त्यांना दिल्या आहेत. या तीन जागा शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या. हे जर ते विसरले असतील किंवा विसरत असतील तर ते योग्य नाही. पण मी परत सांगतो की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशाप्रकारची भूमिका घेणार नाहीत” असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आमच्या प्रत्येकाच्या जागा एकमेकांमुळे वाढल्या आहेत. संजय राऊत मीडियाला बातमी देण्यासाठी बोलले असतील. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल हाच आमचा शब्द” असं बाळासाहेब थोरात म्हणाले. “मुख्यमंत्रीपदावरुन कोणताही तीढा निर्माण होणार नाही. विजयी होऊ शकतील अशा जागांबाबत आग्रही राहणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं स्वाभाविक आहे” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
सुजय विखेंबद्दल बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
“काही जागांवर चर्चा सुरु आहे. याचा अर्थ वाद आहे असं नाही. पंतप्रधान वारंवार महाराष्ट्रात येतायेत कारण ते घाबरलेत” असं बाळासाहेब थोरात म्हणाले. माजी खासदार सुजय विखे पाटील हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधून विधानसभेसाठी ते इच्छुक आहेत. यावर बाळासाहेब थोरात बोलले आहेत. “आम्ही महाविकास आघाडीचे ते महायुतीचे ते परिवर्तनावर बोलणारच ना आणि प्रत्येकाला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे” असं ते म्हणाले.