अहमदनगर : विखे कुटुंबाने काँग्रेस पक्षाकडे जे मागितलं, ते दिलं. त्यामुळे मुलाने हट्ट केला, तर वडिलांनी त्याला समजवायला हवं होतं, असे म्हणत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. कालच राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?
“डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा विरोधी पक्षनेत्यांनी (राधाकृष्ण विखे पाटील) सर्वप्रथम निषेध करायला हवा. विखे पाटलांनी नैतिकता म्हणून लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी.”, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली. तसेच, “भाजपच कमळ हातात येताच सुजय विखेंचे सूर बदलले. भाजपविरोधात टीका करणारे आता त्याच पक्षाची विचारधारा आडल्याचे सांगत आहेत.” असेही थोरात म्हणाले.
विखे कुटुंबाने काँग्रेसकडे जे मागितलं, ते पक्षाने दिलं. मुलाने हट्ट केला, तर वडिलांनी समजावायला हवं होतं, असे म्हणत बाळासाहेब थोरातांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधला.
सुजय विखे भाजपमध्ये!
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने थेट विरोधी पक्षनेत्याच्या घरातच खिंडार पाडली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनाच पक्षात घेऊन भाजपने मोठी खेळी खेळली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील हे लढण्यास इच्छुक होते. मात्र ही जागा आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला येत असल्याने, सुजय विखे पाटलांची गोची झाली होती. अखेर लोकसभा लढण्याचं निश्चित केलेल्या सुजय विखेंनी भाजपचं ‘कमळ’ हाती घेतलं आणि काल (12 मार्च) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.