नवी दिल्ली | 29 डिसेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अतिशय महत्त्वाच्या हालचाली घडताना दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जोरदार हालचाली घडत आहेत. मविआत जागावाटपावरुन ठाकरे गट आणि काँग्रेसकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. ठाकरे गटाला 48 पैकी 23 जागांवर निवडणूक लढवायची आहे. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा त्याला विरोध आहे. महाविकास आघाडीत समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला ठरावा, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि ठाकरे गटात शाब्दिक संघर्ष होताना दिसत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीत महत्त्वाच्या आणि मोलाच्या हालचाली घडत आहेत.
महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या हायकमांडने दिल्लीत आज काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना बोलावण्यात आलं आहे. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण दिल्लीला गेले आहेत. या बैठकीत लोकसभा जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. काँग्रेस नेते या बैठकीत काँग्रेस पक्षाचा अहवाल देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
इंडिया आघाडीसाठी स्थानिक राज्यांतील युती करण्याची जबाबदारी गेहलोत समितीवर नेमण्यात आली आहे. गेहलोत समिती आज आणि उद्या सर्व राज्यांशी चर्चा करणार आहे. या समितीच्या माध्यमातून घटक पक्षांना शिफारशी दिल्या जाणार आहेत. येत्या 2 किंवा 3 जानेवारीला काँग्रेसचे नेते इंडिया आघाडीतील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर काँग्रेसचा 4 जानेवारीला जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. महाराष्ट्र, झारखंड राज्यात आघाडीची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत जोरदार घडामोडी सुरु आहेत. दिल्लीत आज काँग्रेस कार्यालयात मोठ्या हालचाली घडत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
हेही वाचा | अक्कू यादव हत्याकांड | 200 ते 400 महिलांनी मिळून त्याला कोर्टात का संपवलं?
दरम्यान, काँग्रेसची 4 जानेवारीला पुन्हा एकदा बैठक होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष, प्रभारी, महासचिव यांची बैठक होणार आहे. त्यानंतर ज्या 14 राज्यांमध्ये भारत न्याय यात्रा जाणार त्याबाबतचे नियोजन केले जाणार आहे. या यात्रेचं 4 जानेवारीला यात्रेचा लोगो आणि डिझाईन प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानंतर 8 जानेवारीला यात्रेचा मार्ग सांगितला जाणार आहे. तसेच 12 जानेवारीला यात्रेचे थीम साँग लॉन्च होणार आहे.
एकीकडे काँग्रेसच्या गोटात एवढ्या सगळ्या घडामोडी सुरु असताना महाविकास आघाडीची 31 डिसेंबरला महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील तीनही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याबाबतचा निर्णय महाराष्ट्रातच होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे.