‘आम्ही आज हरलो असू, पण उद्या…’, नाना पटोलेंनी ‘हुंकार’ भरला

| Updated on: Dec 03, 2023 | 3:51 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली. चार पैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसला अपयश येताना दिसत आहे. या निकालावर नाना पटोले यांनी भूमिका मांडली. आम्ही आज जरी हारलो असलो तरी लोकसभा निवडणुकीत आम्ही जिंकून येणार, असं नाना पटोले म्हणाले.

आम्ही आज हरलो असू, पण उद्या..., नाना पटोलेंनी हुंकार भरला
नाना पटोले
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई | 3 डिसेंबर 2023 : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीगडमध्ये भाजपला मोठा विजय मिळताना दिसतोय, तर काँग्रेसच्या हातून राजस्थान आणि छत्तीसगडमधील सत्ता निसटताना दिसत आहे. याशिवाय मध्य प्रदेशातही काँग्रेसला मोठा फटका बसताना दिसतोय. फक्त तेलंगणात काँग्रेसला मोठं यश मिळताना दिसत आहे. निकालाच्या समोर आलेल्या आकडेवारीवर महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी पराभव स्वीकारला आहे. या निवडणुकीत ज्या ऋटी आढळल्या आहेत त्या दुरुस्त करुन आम्ही पुढे जाऊ. पराभूत झालेल्या तीनही राज्यांमध्ये काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

“दक्षिणेमध्ये भाजपची दारे बंद झाली आहेत. पण उत्तर भारतात विशेषत: जे ध्रुवीकरणाचं राजकारणात करण्यात त्यांना यश आलेलं आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही. हिंदू-मुस्लिम विषयावर भाजप राजकारण करतंय हे या निमित्ताने स्पष्ट होतंय. जनतेच्या विकासाच्या प्रश्नाबाबत भाजप नेहमी दूर पळतंय हे चित्र आपण पाहतोय. आम्ही आज हरलो असू पण उद्या जनता जनार्धन काँग्रेसला देशाच्या सत्तेत आणल्याशिवाय राहणार नाही. देशपातळीवर तसं वातावरण आज निर्माण झालेलं आहे”, असा दावा नाना पटोले यांनी केला.

‘लोकसभेत काँग्रेसला कौल मिळेल’

“लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारला परास्त केल्याशिवाय लोकं शांत बसणार नाहीत. त्या पद्धतीचं जनमत आपल्याला बघायला मिळतंय. आपल्याला लक्षात असेल मागच्या निवडणुकीवेळी आम्ही छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश जिंकलो होतो. पण त्या निवडणुका जिंकल्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आमचे खासदार तितके निवडून आले नाहीत. आता तेच होणार आहे. आता यांना कौल दिला असेल, पण लोकसभेत काँग्रेसला कौल मिळेल”, असादेखील दावा नाना पटोलेंनी केला.

‘जनता काँग्रेसच्या पाठिशी उभी राहणार’

“आमच्या ज्या काही ऋटी होत्या तिथे आम्हाला शिकालया मिळालं. त्या ऋटी आम्ही दुरुस्त करु आणि पुढे जाऊ. काँग्रेस पक्ष कधी बार्गेनिंगमध्ये राहिला नाही. काँग्रेस पक्ष नेहमी देशातील प्रत्येक पक्षाला घेऊन चालणारा पक्ष राहिला आहे. देशाच्या संविधानिक व्यवस्था आणि देशाचं स्वातंत्र्य हेच काँग्रेसला महत्त्वाचं आहे. खुर्चीपेक्षा काँग्रेस त्याच विचाराने देशामध्ये लढा देत आहे. जनता काँग्रेसच्या पाठिशी उभी राहणार आहे. आम्हाला ज्या काही ऋटी आल्या आहेत त्या दुरुस्त करुन आम्ही पुढे जाऊ. लोकसभा निवडणुकीत आम्ही विजय प्राप्त करु”, असं नाना पटोले म्हणाले.

“त्यांना काय चेष्ठा करायची तो त्यांचा प्रश्न आहे. राज्यामध्ये शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत, त्यावर बोला ना. शेतकऱ्यांना कसं वाचवता येईल, त्यांना कसा न्याय देता येईल, तरुणांच्या आंदोलनावर बोला ना. राहुल गांधी देशासाठी काम करतात. राहुल गांधी देशासाठी जगतात. कोण कशासाठी जगतात हे सांगायची गरज नाही. मी त्यामध्ये जाणार नाही”, असंही नाना पटोले म्हणाले.