इंदापूर : आघाडी ही सन्मानपूर्वक असावी. काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे, सोबतच मित्रपक्षही वाढवा. आमचा गळा कापून किंवा आमच्या छाताडावर पाय देऊन तुम्ही पुढे जाऊ नका, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावलं आहे. दरम्यान, याबाबत पक्षाचे वरीष्ठ नेते योग्य निर्णय घेऊन कार्यकर्त्यांच्या भावनांना न्याय देतील, अशी ग्वाहीही पृथ्वीराज चव्हाण यांनी इंदापुरातील कार्यकर्त्यंना दिली.
लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीने अनेक पक्षांना एकत्र घेत आघाडीद्वारे निवडणुका लढवण्याची घोषणा केली. त्यानुसार वरीष्ठ नेत्यांच्या बैठकाही सुरु आहेत. असं असताना इंदापूर विधानसभेची जागा कोणत्या पक्षाला देणार हे लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करावं, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांसह नेत्यांनी केली आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना साकडं घालण्यात आलं. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी इंदापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची समजूत काढली.
इंदापूर नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ शनिवारी पार पडला. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे, आमदार संग्राम थोपटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीकडून होणाऱ्या दगाबाजीबद्दल खंत व्यक्त केली.
आम्ही लोकसभेत आघाडी धर्म पाळून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम करतो. मात्र राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीत नेहमीच दगाफटका होतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेची जागा कोणत्या पक्षाला हे जाहीर करावं, अन्यथा आम्ही लोकसभेत आघाडीचं काम करणार नाही, अशी भूमिका यावेळी जाहीर करण्यात आली. त्यानंतर हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे, संग्राम थोपटे, संजय जगताप यांनीही राष्ट्रवादीकडून चालणाऱ्या कुरघोड्यांबाबत पक्ष नेतृत्वानं आताच योग्य ती पावलं उचलावी, अशी आग्रही मागणी केली.
सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडून वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र कार्यक्रम घेऊन वातावरण निर्मिती होऊ लागली आहे. मात्र इंदापूरमध्ये वेगळीच परिस्थिती आहे. मात्र आता मतदारही जागृत झाला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद देण्याची गरज असल्याचं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकांमध्ये इंदापूरसह जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळला. तसाच आघाडीचा धर्म मित्रपक्षानंही पाळला पाहिजे. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीकडून भाजप-सेनेऐवजी काँग्रेसवरच टीका केली जाते. बारामती लोकसभा हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ असतानाही ही वागणूक मिळत असल्यानं आता आघाडीसाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी या सर्व कुरघोड्या थांबवाव्यात. त्यासाठी वरीष्ठ पातळीवरुन ठोस निर्णय व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
निवडणुकांपूर्वी मित्रपक्षाकडून काँग्रेसला सोबत घेण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं दिली जातात. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या कुरघोड्या सुरु होतात. त्यामुळे त्यांच्या वरीष्ठ नेत्यांकडून याबाबत योग्य तो निर्णयघ्यावा अशी मागणी माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केली. राष्ट्रवादीकडून काँग्रेसला नामोहरम करण्याची एकही संधी सोडली जात नाही. लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीला काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची आठवण येते. मात्रनंतर बंडखोरीचा सामना आम्हालाच करावा लागतो अशी तक्रार संग्राम थोपटे यांनी केली. या जिल्ह्यातील जागा काँग्रेसला मिळणार असतील तरच आघाडी करावी अशीही मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादीनं लोकसभा निवडणुकीपूर्वीइंदापूर आणि पुरंदरची जागा काँग्रेसला जाहीर करावी, लादलेले उमेदवार आम्हाला नकोत, अशी भूमिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी जाहीर केली.
काँग्रेस- राष्टवादीनं एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर इंदापूरची जागा काँग्रेसला मिळणार की राष्ट्रवादीला याबाबत निर्णय झालेला नाही. ही जागा काँग्रेसला द्यावी, तसेच आघाडी धर्म पाळला जावा, अशी इंदापूरमधील कार्यकर्त्यांची भूमिका आहे. त्यामुळेच शनिवारी इंदापूर नगरपरिषदेच्या कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीपूर्वी इंदापूरच्या जागेचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा लोकसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेण्याचा पवित्रा काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाहीर केला आहे. त्याचवेळी व्यासपीठावर उपस्थित नेत्यांनीही राष्ट्रवादीकडून होणाऱ्या कुरघोडीच्या राजकारणाबद्दल तक्रारींचा पाढाच वाचला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी ही धुसफूस शांत करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना सामंजस्य दाखवून तोडगा काढावा लागणार आहे.