Rahul Gandhi News | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मध्य प्रदेशमध्ये पोहोचली आहे. या यात्रेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी अंबानी कुटुंबातील लग्नावरुन टोमणा मारला. अंबानींच्या घरी लग्नसोहळा सुरु आहे. लोक तिथे सेल्फी काढतायत आणि तुम्ही इथे भूकेने मरताय. जगभरातील लोक या लग्नासाठी पोहोचतायत. गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा प्री-वेडिंग लग्न सोहळा झाला.
ग्वालियरमध्ये लोकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, “राहुल गांधी जे बोलतोय, ते कसं दिसणार?. टीव्हीवर अंबानींच्या मुलाच लग्न दाखवल जातय. धुमधडाक्यात लग्न सुरु आहे. जगभरातले लोक येतायत. सेल्फी काढतायत आणि तुम्ही लोक इथे भूकेने मरताय” मीडियामध्ये माझ्या वक्तव्यांना स्थान दिलं जात नाही, असा राहुल गांधी यांचा आरोप आहे. ग्वालियरमध्ये दाखल झालेल्या राहुल गांधी यांनी हेच इथे म्हटलं.
…म्हणून छोटे उद्योग संपवल्याचा आरोप
“‘भारत जोड़ो यात्रे’ नंतर आम्ही ‘भारत जोड़ो न्याय यात्रा’ सुरु केलीय. या यात्रेत आम्ही ‘न्याय’ शब्द जोडलाय. आम्ही न्याय शब्द यासाठी जोडलाय कारण देशात जो द्वेष पसरतोय, त्यामागे कारण अन्याय आहे” असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्यावरुन सरकारला घेरलं. “सध्या देशात 40 वर्षांपेक्षा जास्त बेरोजगारी आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीएसटी आणि नोटबंदीने छोटे उद्योग संपवले” असं राहुल गांधी म्हणाले.
मोठ्या कंपन्यांच्या मॅनेजमेंटमध्ये ओबीसी, दलित का नाही?
ग्वालियरमध्ये राहुल गांधी पुन्हा जातीय जनगणनेबद्दल बोलले. “देशात 50% ओबीसी, 15% दलित आणि 8% आदिवासी वर्गातील लोक आहेत. म्हणजे एकूण 73% लोक होतात. तुम्हाला देशातील मोठमोठ्या कंपन्यांच्या मॅनेजमेंटमध्ये एकही ओबीसी, दलित आणि आदिवासी समाजातील माणूस मिळणार नाही. आम्ही जातीय जनगणनेबद्दल बोलतो, त्यावेळी नरेंद्र मोदी म्हणतात, देशात दोनच जाती आहेत. श्रीमंत आणि गरीब. कोणाची किती भागीदारी आहे, हे देशातील 73 टक्के लोकांना कळाव असं त्यांना वाटत नाही” असं राहुल गांधी म्हणाले.
आता सर्वकाही प्रायवेट
“देशातील 73 टक्के लोक मोठी रुग्णालय, खासगी शाळांच्या मॅनेजमेंटवर दिसत नाही. हे लोक तुम्हाला मनरेगा, मजुरीमध्ये दिसतील. हे 73 टक्के लोक मनरेगा, मजुरीच्या कामामध्ये दिसत असतील, तर मोठी रुग्णालय, खासगी शाळा आणि कंपन्यांच्या मॅनेजमेंटमध्ये का नाही दिसत? आधी सरकारी नोकऱ्या होत्या. त्यावेळी 73 टक्के लोकांना भागीदारी मिळायची. पण आता सर्वकाही प्रायवेट आहे” असं राहुल गांधी म्हणाले.