जयपूर | 21 नोव्हेंबर 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीत सर्वच पक्षांकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही जालोरमध्ये मोठी रॅली केली. यावेळी त्यांनी वर्ल्ड कप सामन्याचा उल्लेख करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. काहीही असेल आपली टीम जिंकली असती. पण पनवतीने पराभूत केलं, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे, राहुल गांधी यांच्या टीकेवर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. राहुल यांनी जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे.
जालोर येथे एका प्रचंड सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांचं भाषण सुरू होताच सभेला आलेल्या लोकांनी पनवती… पनवती अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर राहुल गांधी यांनी हे उद्गार काढले. बरं वाईट काही का असेना आपली टीम जिंकली असती. पण पनवतीने पराभूत केलं. टीव्हीवाले हे बोलणार नाही. पण जनतेला सर्व माहीत आहे, असं राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी एकप्रकारे टीम इंडियाच्या पराभवाचं खापर राहुल गांधी यांच्यावर फोडलं आहे. मोदींना स्टेडियममध्ये पाहून आपले खेळाडू दबावाखाली आले. त्यामुळे आपण पराभूत झालो. कारण खेळाडू तणावाखाली होते. तेच पराभवाचं एकमेव कारण आहे. त्यांना खेळाडूंचं मनोबलच वाढवायचं होतं तर वर्ल्डकपपूर्वीच खेळाडूंना भेटायचं होतं. अंतिम सामना पाहायला जाण्याची काहीच गरज नव्हती, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा पराभव झाला. त्यामुळे त्याच दिवशी अचानक पनवती हा शब्द ट्विटरवर ट्रेंड करत होता. त्यामुळे विरोधकांनीही त्याचा आधार घेत पंतप्रधानांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मोदी स्वत: मोदी स्टेडियममध्ये आल्यामुळे टीम इंडिया पराभूत झाल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.