मुंबई : काँग्रसने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले काँग्रेस नेते विश्वनाथ पाटील यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विश्वनाथ पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे विश्वनाथ पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
विश्वनाथ पाटील हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य असून, ते लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही होते. काही दिवसांपूर्वीच विश्वानाथ पाटील यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. विश्वनाथ पाटील यांना काँग्रेसने भिवंडीतून उमेदवारी नाकारल्याने, ते नाराज आहेत. काँग्रेसने भिवंडीतून सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे.
दुसरीकडे, भिवंडीतून शिवसेना-भाजप युतीकडून विद्यामाना भाजप खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, कपिल पाटलांबद्दल शिवसैनिकांच्या मनात नाराजी आहे.
कोण आहेत विश्वनाथ पाटील?
निवडणुकीच्या तारखा जाहीर :
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.