मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गेलो नसतो आणि काँग्रेसमध्ये असतो तर कदाचित मी मुख्यमंत्री झालो असतो, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. भुजबळांच्या या दाव्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जर-तरला राजकारणामध्ये कोणते स्थान नसते. त्यामुळे ते काय बोलले याला काही महत्त्व नाही. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. देशामध्ये आज अनेक प्रश्न आहेत. 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, आरोग्य व्यवस्था बरोबर नाही. देशामध्ये गरिबांच्या अन्नधान्यासाठी अनेक प्रश्न आहेत. रोजगाराचा प्रश्न आहे. हे प्रश्न काँग्रेसला महत्त्वपूर्ण आहेत. फालतूच्या राजकीय चर्चेपेक्षा काँग्रेस यांना महत्त्व देते”, असा टोला नाना पटोले यांनी छगन भुजबळ यांना लगावला..
महाराष्ट्रमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहेत. यात 13 लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे. याविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “गेल्या चार टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला लोकांनी कौल दिला आणि या पाचव्या टप्प्यातही मी सर्व लोकसभा क्षेत्र फिरलो. लोक मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करतील”, अशी अपेक्षा त्यांनी गोंदिया येथील सडक अर्जुन येथे व्यक्त केली.
“1991 साली शिवसेना सोडून मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजप शिवसेनेच्या विरोधात काम केले म्हणून अनेक वेळा माझ्यावर जीवघेणे हल्ले झाले होते. 1995 मध्ये युती सरकार आले. मला विधान परिषदेतून आमदार करण्यात आले. विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. त्यानंतर 1999 मध्ये काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मी शरद पवार यांच्यासोबत गेलो. त्यावेळी काँग्रेसने मला शरद पवार यांच्यासोबत जाऊ नये म्हणून सांगितले. तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ, असेही सांगण्यात आले. परंतु मी पवार साहेबांची साथ दिली. त्यावेळी मी पवार साहेबांबरोबर गेलो नसतो तर मुख्यमंत्री झालो असतो”, असं छगन भुजबळ म्हणाले.