औरंगाबाद : सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार अब्दुल सत्तार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसला राम राम ठोकून बाहेर पडलेले आमदार अब्दुल सत्तार आता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे.
…म्हणून अब्दुल सत्तार यांचा काँग्रेसचा राजीनामा
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रसने विधान परिषदेचे आमदार सुभाष झाम्बड यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार नाराज झाले. त्यांनी थेट काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत, काँग्रेस पक्षातूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या भाजप नेत्यांशी भेटीगाठी सुरु झाल्या.
काँग्रेस सोडल्यानंतर अब्दुल सत्तारांनी पक्ष कार्यलायातील खुर्च्याही घरी नेल्या!
मुख्यमंत्र्यांशी दुसरी भेट
काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देण्याच्या आदल्याच दिवशी अब्दुल सत्तार यांनी मुंबईत येऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळीही ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अब्दुल सत्तार यांनीच या चर्चा फेटाळल्या होत्या.
औरंगाबादमधून सत्तार अपक्ष लढणार
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आमदार अब्दुल सत्तार अपक्ष लढणार आहेत. या मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, तर वंचित बहुजन आघाडीकडून आमदार इम्तियाज जलील रिंगणात आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सुभाष झाम्बड लढत आहेत.
कोण आहेत अब्दुल सत्तार?
अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या जवळपास 30 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून, 1984 साली ग्रामपचंयत निवडणुकीपासून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. सिल्लोड आणि परिसरात अब्दुल सत्तार यांची राजकीय ताकद मोठी आहे.