मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारलं आहे. काँग्रेसने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने, आमदार अब्दुल सत्तार नाराज होते. अखेर त्यांनी आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा देण्याचा निर्णय घेऊन, अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमधून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.
आमदार अब्दुल सत्तार हे काँग्रेसच्या सदस्यत्वाचा उद्या (25 मार्च) राजीनामा देणार आहेत. तसेच, त्यांनी आमदारकीचा याआधीच राजीनामा दिला आहे. तो अद्याप मंजूर झालेला नाही. मात्र, औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी जाहीर केले आहे.
याच सर्व पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीमुळे आणखी चर्चांना उधाण आले. मात्र, पाठिंबा मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, सर्वपक्षियांना पाठिंबासाठी भेटणार आहे, असे स्पष्टीकरण अब्दुल सत्तार यांनी दिले.
आपण भाजपात जाणार नाही, मुख्यमंत्र्यांनीही तशी ऑफर दिली नाही, असेही अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले.
अशोक चव्हाणांबाबत बोलताना, अब्दुल सत्तार म्हणाले, “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिल्लीत विश्वासात घेतलं जात नाही. अशोक चव्हाणच हतबल आहेत.”
अशोक चव्हाण काय म्हणाले?
“अब्दुल सत्तार यांना हवे असल्यास त्यांनी उमेदवारी लढवावी. त्यांना कुठे पाहिजे तिथे उमेदवारी दिली असती. त्यांच्या उमेदवारीचा काही विषय नाही. अपक्ष काही लढायची गरज नाही.”, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.
कोण आहेत अब्दुल सत्तार?
अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या जवळपास 30 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून, 1984 साली ग्रामपचंयत निवडणुकीपासून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. सिल्लोड आणि परिसरात अब्दुल सत्तार यांची राजकीय ताकद मोठी आहे.