नागपूर, दि.18 डिसेंबर | आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याबाबत आरोप केले. या आरोपानंतर खळबळ माजली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले. एसआयटीची स्थापना झाली. नितेश राणे यांच्या आरोपानुसार ठाकरे गटाचा नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे सलीम कुत्तासोबत पार्टीत सहभागी झाले. परंतु आता काँग्रेस आमदाराने नवीनच दावा केला आहे. त्यानुसार सलीम कुत्ता याची १९९८ मध्ये हत्या झाली. हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला, असा दावा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याला यांनी केला आहे. यामुळे सुधाकर बडगुजरसोबत असणारा सलीम कुत्ता कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी निवेदन करावे, अशी मागणी आमदार गोरंट्याला यांनी केली.
सलीम कुत्ता याची १९९८ मध्येच रुग्णालयात हत्या झाली होती, असा दावा काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याला यांनी विधानभवन परिसरात केला. त्यांच्या दाव्यानुसार, रोहित वर्मा, बाळू ठाकरे आणि संतोष शेट्टी यांनी ही हत्या केली. हे छोटा राजनचे हस्तक आहेत. मग नितेश राणे यांनी कोणता सलीम कुत्ता आणला, हे मला माहीत नाही. हा सलीम कुत्ता नवीन कोणता आला, हे आम्हाला माहीत नाही. परंतु गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल पूर्ण माहिती सदनमध्ये द्यावी.
सलीम सलीम कुत्ता याला तीन बायका आहेत. त्याच्या तिन्ही बायकांनी कोर्टात सांगितलं की, आता आमचा नवऱ्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे सरकारने त्याची जी संपत्ती सीज केली ती परत द्यावी. त्यानुसार न्यायालयाने जप्त केलेली संपती सलीम कुत्ता याच्या कुटुंबियांना परत केली होती, असा दावा कैलास गोरंट्याला यांनी केला आहे.
नाशिक पोलीस घेणार सलीम कुत्ताचा जवाब घेणार असल्याची बातमी सोमवारी आली आहे. त्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक लवकरच येरवडा जेलमध्ये जाणार आहे. 1993 बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सध्या येरवडा जेलमध्ये असल्याचे म्हटले आहे.