मुंबई, दि. 21 फेब्रुवारी 2024 | महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला सध्या धक्के बसत आहेत. माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी 55 वर्षांपासून काँग्रेसशी असलेले नाते संपुष्टात आणले. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. त्यांच्या काही दिवसानंतर काँग्रेस मुंबई काँग्रेसमधील मोठे नाव आणि वांद्रे पूर्वचे माजी आमदार बाबा सिद्धीकी यांनीही काँग्रेसची साथ सोडली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडले. एकापोठापाठ एक बसलेल्या या धक्क्यांमधून काँग्रेस सावरत आहे. आता काँग्रेसने बाबा सिद्धीकी यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांच्यावर कारवाई केली आहे. झिशान यांची मुंबई युवक अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे.
४८ वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडला. १० फेब्रुवारी रोजी ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे. त्यावेळी झिशान सिद्दीकी यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे म्हटले होते. परंतु झिशान यांनी पक्ष सोडण्यापूर्वी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन झिशान यांना हटवण्यात आले आहे. आता मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अखिलेश यादव यांना देण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षातून महत्त्वाचे नेते बाहेर पडत आहेत. त्याचा काँग्रेसने विचार करायला हवा. हे नेते पक्ष सोडत आहे, त्यावर चर्चा व्हायला हवी, असे नेते झिशान सिद्दीकी यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. आपण सध्या काँग्रेसमध्येच आहे. कोणत्या पक्षात जाण्याचा आपण विचार केलेला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. अंतर्गत गटबाजी आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमुळे काँग्रेसचे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
बाबा सिद्दीकी हे मुंबईतील मुस्लिम चेहरा म्हणून राजकारणात प्रसिद्ध आहेत. तीन वेळा ते वांद्रा येथून आमदार राहिले आहेत. त्यांचे बॉलीवूडमध्ये चांगला संपर्क आहे. शाहरुख, सलमान खानपासून अनेक बॉलीवूड कलाकरांचा त्यांच्याशी संबंध आहे.
हे ही वाचा
बाबा सिद्दीकी यांच्या एका आमंत्रणावर संपूर्ण बॉलीवूड येतो धावून, कारण…