नवी दिल्ली: काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठं विधान केलं आहे. जी-23ने अंतर्गत निवडणुका घेऊन पूर्णवेळ अध्यक्ष देण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण झाली आहे. परंतु, पक्षाला पार्ट टाईम अध्यक्ष नको. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा. नव्या अध्यक्षाने लोकांची मोकळेपणाने भेट घेतली पाहिजे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. तर अध्यक्षपदाच्या रेसमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हे सर्वात आघाडीवर आहे. मात्र, चव्हाण यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असावा ही आमची मागणी पूर्ण झाली आहे. आता या निवडणुका पारदर्शीपणे पार पडाव्यात, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी काँग्रेसने मुंबईत केलेल्या ठरावावर टीका केली. मुंबईत करण्यात आलेल्या ठरावाची गरज नव्हती. सर्व पदावर निवडणूका व्हायला पाहिजे. मुंबईत झालेले ठराव कोणी केले मला समजत नाही. असे ठराव कोण करतंय?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी जबाबदारी घ्यावी, असं या ठरावात म्हटलं आहे. राहुल गांधी यांना तुम्ही अर्ज भरा अशा विनंती करू शकता. पण मी अध्यक्ष नाही, मी कोणाला भेटणार नाही. असं चालणार नाही. पूर्ण वेळ अध्यक्ष हवा. जबाबदारी घ्यायला तयार असेल तर काही हरकत नाही, असंही ते म्हणाले.
काँग्रेस पक्ष जेव्हा नरेंद्र मोदी यांना हुकूमशहा म्हणतो तेव्हा काँग्रेस पक्ष तरी लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे. राहुल गांधींना देखील हे मान्य नसेल. हे ठराव कोणी केले हे मधुसुदन मिस्त्री यांनी स्पष्ट करायला हवं, असं त्यांनी सांगितलं.
अशोक गेहलोत जर राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर आणि अध्यक्ष पदावर राहिले तर आमचा त्याला विरोध राहील. आम्हाला बिलकूल चालणार नाही. आमचा याला विरोध राहील. आम्हाला पूर्ण वेळ अध्यक्ष हवा आहे, असा इशाराही त्यांनी दिला.