संदीप राजगोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. या चारही राज्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तर भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षाला सत्तेसाठी काही जागा कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आमदारांची फोडाफोडी आणि पळवा पळवी रोखण्यासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू झालं आहे. काँग्रेस आणि भाजपने आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्याचा प्लान तयार केला आहे. सर्वच संभाव्य आमदारांना तसे फोनही गेले आहेत.
चार राज्यातील निवडून आलेल्या आमदारांना एकत्र बोलावलं जाणार आहे. सर्व आमदारांना एकाच रिसॉर्टमध्ये ठेवण्याच्या काँग्रेस हायकमांडकडून सूचना देण्यात आल्या आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिवकुमार यांना हे आमदार सांभाळण्यास सांगण्यात आळं आहे. चार राज्यातील आमदारांना राजस्थानमध्ये आणले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
आमदारांची तोडफोड रोखण्यासाठी डीके शिवकुमार यांच्यासह कर्नाटकाचे 11 मंत्री हैदराबादला पोहोचले आहेत. प्रत्येक उमेदवारासोबत एक कार्यकर्ता देण्यावर काँग्रेसने भर दिला आहे. हा कार्यकर्ता उमेदवाराचं संरक्षणही करेल आणि त्याच्यावर नजरही ठेवून राहील, यासाठी हा कार्यकर्ता देण्यात आला आहे.
राजस्थान निवडणुकीपूर्वी काँग्रेसने त्यांच्या उमदेवारांना सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत जयपूरला येण्यास सांगितलं आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शनिवारी उमेदवारांसोबत एक मिटिंग केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
एकीकडे काँग्रेसने आमदार वाचवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच भाजपही अॅक्टिव्ह मोडमध्ये आला आहे. राजस्थानमध्ये वसुंधरा गटाने रात्री उशिरापर्यंत बैठक केली. ही मिटिंग रात्री 3 वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर सकाळीच भाजपचे उमेदवार वसुंधरा राजे यांच्या घरी पोहोचण्यास सुरू झाले आहेत.
दरम्यान, तेलंगणातील सत्ता स्थापनेची जबाबदारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर देण्यात आली आहे. सुशीलकुमार शिंदे थोड्याच वेळात विशेष विमानाने तेलंगणाला येणार आहेत. काँग्रेसचे अनुभवी नेते म्हणून कर्नाटक नंतर तेलंगणातील सत्ता स्थापनेची जबाबदारी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर देण्यात आली आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस सत्तेवर येण्याचा काँग्रेसच्या नेत्यांना विश्वास असल्याने निकालापूर्वीच सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.