महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप सुरळीत व्हावं, यासाठी काँग्रेसकडून पावलं उचलण्यात आली आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट असे तीन पक्ष आहेत. यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटामध्ये काही जागांवरुन तीव्र मतभेद झाल्याची बातम्या आल्या होत्या. मविआच्या जागा वाटपाच्या बैठकीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या होत्या. या वादानंतर ठाकरे गटाने टोकाची भूमिका घेतली. नाना पटोले असतील तर महाविकास आघाडीची जागावाटपावर बैठक होणार नाही, अशी भूमिकाच ठाकरे गटाने घेतल्याची चर्चा सुरु झाली.
त्यामुळे काँग्रेसने तातडीने पावलं उचलत प्रभारी रमेश चेन्नीथला यांना आज मुंबईत पाठवलं. रमेश चेन्नीथला यांनी आज मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. “मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंना भेटलो. ते रुग्णालयात होते. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होते. महाविकास आघाडीची प्रकृती सुद्धा ठीक आहे. महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत. आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहोत. आज दुपारी 3 वाजता नाना पटोले आणि संजय राऊत जागावाटपावर चर्चा करतील” असं रमेश चेन्नीथला यांनी सांगितलं.
चेन्नीथला-उद्धव ठाकरे भेटीनंतर संजय राऊत काय म्हणाले?
“लवकरात लवकर उमेदवार यादी जाहीर व्हावी अशी अपेक्षा. आज रात्री उशिरापर्यंत जागा वाटपाची चर्चा पूर्ण करु. महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. नाना पटोले आजच्या बैठकीला उपस्थित असतील. चर्चेचा वेग कमी होता. आज दुपारी पुन्हा बैठक” असं संजय राऊत म्हणाले. “तिन्ही पक्षात फार मोठे मतभेद नाहीत. आघाडीच्या राजकरणात अशा एखाद दुसऱ्या जागेवरुन चर्चा वाढत असते” असं राऊत म्हणाले.
आज सकाळी संजय राऊत काय म्हणाले?
“काँग्रेस आणि आमच्यामध्ये जागा वाटपाची चर्चा थांबलेली असं म्हणता येणार नाही. काल दिवसभर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली चर्चा सुरु होती. जयंत पाटील आणि आम्ही चर्चेला बसलो होतो. राष्ट्रवादी आणि आमच्यातील बरेचसे पेच सुटलेले आहेत. शेवटी एकत्र बसून गुंता सोडवण्याची मानसिकता लागते, ती आमच्या दोघांमध्ये आहे” असं खासदार संजय राऊत आज म्हणाले. “राष्ट्रवादी आणि आमच्यात जागा वाटप संपलेलं आहे. आमच्यात फार मतभेद नाहीत. आमच हायकमांड मुंबईत आहे. काँग्रेस-शिवसेनेत काय फायनल होतं, ते आज 12.30 वाजेपर्यंत समजेल” असं त्यांनी सांगितलं होतं.